पत्नीची हत्या; पतीची जन्मठेप कायम

By Admin | Updated: September 19, 2014 00:53 IST2014-09-19T00:53:55+5:302014-09-19T00:53:55+5:30

चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीची निर्घृण हत्या करणाऱ्या पतीची जन्मठेप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे.

Murder of wife; The husband's life imprisonment continued | पत्नीची हत्या; पतीची जन्मठेप कायम

पत्नीची हत्या; पतीची जन्मठेप कायम

हायकोर्ट : चंद्रपूर येथील घटना
नागपूर : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीची निर्घृण हत्या करणाऱ्या पतीची जन्मठेप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे.
रमेश महादेव पोहनकर (५४) असे आरोपीचे नाव असून तो फिस्कुटी, ता. मूल येथील मूळ रहिवासी आहे. घटनेच्या वेळी तो तुकुम, चंद्रपूर येथे राहात होता. चंद्रपूर सत्र न्यायालयाने १० डिसेंबर २०१० रोजी आरोपीला भादंविच्या कलम ३०२ अंतर्गत दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. याविरुद्ध त्याने उच्च न्यायालयात अपील केले होते. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.
मृताचे नाव सुनीता होते. ती रमेशची दुसरी पत्नी होती. सुनीताला आकाश नामक मुलगा असून घटनेच्या तारखेला तो ११ वर्षांचा होता. रमेश व्यवसायाने शिक्षक होता. तो सुनीताच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. १७ मार्च २००९ रोजी त्यांचे भांडण झाले. दरम्यान, रमेशने सुनीताची विळ्याचे घाव मारून हत्या केली. सुनीताच्या शरीरावर १० घाव होते. रामनगर पोलिसांनी प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. शासनातर्फे एपीपी राजेश नायक यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)

Web Title: Murder of wife; The husband's life imprisonment continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.