सख्ख्या भावाची हत्या

By Admin | Updated: April 27, 2016 02:58 IST2016-04-27T02:58:04+5:302016-04-27T02:58:04+5:30

जिवंतपणीच बाप आणि मुलाच्या फोटोची पूजा मांडणाऱ्या दारुड्या इसमावर त्याच्या सख्ख्या भावाने कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केली.

Murder of a sibling | सख्ख्या भावाची हत्या

सख्ख्या भावाची हत्या

नागपूर : जिवंतपणीच बाप आणि मुलाच्या फोटोची पूजा मांडणाऱ्या दारुड्या इसमावर त्याच्या सख्ख्या भावाने कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केली. मानकापूर-गोधनीतील आशीर्वादनगरात मंगळवारी रात्री ७ ते ७.३० च्या सुमारास हा थरार घडला. त्यानंतर रक्ताने माखलेल्या शरीर आणि कपड्याने आरोपी राजेश निताराम वाघाडे (वय ४५) स्वत:च मानकापूर पोलीस ठाण्यात पोहचला.
संजय ऊर्फ सुरेश निताराम वाघाडे (वय ३५) असे मृताचे नाव आहे. त्याला दारूचे व्यसन होते. त्यामुळे त्याची पत्नी आपल्या मुलाला घेऊन निघून गेली.
तेव्हापासून त्याचे व्यसन आणखीच वाढले. त्याने एक ‘मैत्रिण’ ठेवून घेतली. त्यात दारूच्या नशेत तो उलटसुलट काम करायचा. त्यामुळे राजेश आणि सुरेशमध्ये नेहमीच वाद व्हायचे.
मानकापुरात थरार
नागपूर : या पार्श्वभूमीवर, दारूच्या नशेत असलेल्या सुरेशने आज सकाळपासूनच गोंधळ घालणे सुरू केले. घरासमोरची दोन झाडे तोडून टाकली. सायंकाळी स्वत:चा मुलगा (पत्नीने सोबत नेलेला) आणि जिवंत वडील या दोघांचे फोटो देवांच्या फोटोसमोर ठेवून त्याची पूजा केली. राजेशने त्याला हरकत घेतली. जिवंत मुलगा आणि वडिलाची तू कशाला पूजा मांडली, असे विचारले असता हे दोघेही आपल्यासाठी मेल्याचे सुरेश म्हणाला. त्यावरून दोन भावात जुंपली. बाचाबाचीनंतर ते हाणामारीवर उतरले. सुरेश ऐकत नसल्याने राजेशने घरातील कुऱ्हाड उचलून सुरेशच्या डोक्यावर घाव घातले. सुरेशला रक्ताच्या थारोळ्यात लोळविल्यानंतर आरोपी राजेश मानकापूर ठाण्यात पोहचला. त्याच्या अंगावर, तोंडावर तसेच कपड्यावर रक्ताच्या चिरकांड्या दिसत असल्याने पोलीसही हादरले. राजेशने पोलिसांना हत्या केल्याची माहिती दिली. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन ठाणेदार भटकर आणि मानकापूरचे पोलीस पथक त्याच्या घरी पोहचले. या प्रकारामुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)

वृद्ध आईवडील, मुले आधारहीन
आरोपी राजेशला छोटी मुलं आहेत. त्याची पत्नी काही दिवसांपूर्वी मृत झाली. तो बांधकामस्थळी लोहा बांधण्याचे काम करीत होता. त्याच्या मुलांचा सांभाळ वृद्ध आईवडील करीत होते. एकीकडे सुरेश मृत झाला. तर, राजेश कारागृहात जाईल, त्यामुळे आता त्याचे मुलंच नव्हे तर वृद्ध आईवडीलही आधारहीन झाले आहेत.

Web Title: Murder of a sibling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.