एमआयडीसीत हॉटेल कामगाराची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 22:54 IST2020-09-12T22:52:34+5:302020-09-12T22:54:52+5:30
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाची शनिवारी रात्री अज्ञात आरोपींनी हत्या केली. मृताचे नाव सोहनलाल असल्याचे पोलिस सांगतात. तो शेर-ए-पंजाब नामक हॉटेलमध्ये काम करायचा.

एमआयडीसीत हॉटेल कामगाराची हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाची शनिवारी रात्री अज्ञात आरोपींनी हत्या केली. मृताचे नाव सोहनलाल असल्याचे पोलिस सांगतात. तो शेर-ए-पंजाब नामक हॉटेलमध्ये काम करायचा. दणकट शरीरयष्टीचा सोहनलाल टायगर नावाने ओळखला जात होता. शनिवारी रात्री ८ ते ८.३०च्या सुमारास जखमी अवस्थेत तो प्रियदर्शिनी कॉलेजच्या गेटजवळ पडून असल्याचे नागरिकांना दिसले. नागरिकांनी एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. रात्री ९ च्या सुमारास त्याला लता मंगेशकर इस्पितळात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. टायगरच्या गळ्यावर धारदार शस्त्राचे घाव आहेत. त्याची हत्या कुणी केली, कोणत्या कारणामुळे केली, याचा वृत्त लिहीस्तोवर उलगडा झाला नव्हता. एमआयडीसी पोलिस तसेच गुन्हे शाखेचे पथक त्या भागात आरोपींची शोधाशोध करण्यासाठी फिरत होते. या घटनेसंदर्भातील विस्तृत माहिती रात्री १० वाजेपर्यंत उपलब्ध होऊ शकली नाही.