दारूच्या वादातून गुन्हेगाराचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:11 IST2021-09-06T04:11:35+5:302021-09-06T04:11:35+5:30

नागपूर : पारडीच्या महाजनपुरात दारू पीत असताना झालेल्या वादात दोन युवकांनी एका गुन्हेगाराच्या घरात घुसून त्याचा खून केला. या ...

Murder of a criminal over an alcohol dispute | दारूच्या वादातून गुन्हेगाराचा खून

दारूच्या वादातून गुन्हेगाराचा खून

नागपूर : पारडीच्या महाजनपुरात दारू पीत असताना झालेल्या वादात दोन युवकांनी एका गुन्हेगाराच्या घरात घुसून त्याचा खून केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. रमेश ऊर्फ काल्या खामदेव डांगरे (२६) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी गोट्या दुरगुडे आणि पीयूष पंचबुद्धे या युवकांना अटक केली आहे.

काल्या पारडी परिसरातील जुना गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध खुनासह अनेक गुन्हे दाखल आहेत. तो परिसरात अवैधरीत्या दारूविक्री करीत होता. पोलिसांच्या कारवाईमुळे काही दिवसांपासून तो शांत होता. महाजनपुरात तो आजीसोबत राहत होता. त्याचे आईवडील आणि इतर कुटुंबीय वेगळे राहतात. रविवारी सकाळी दारू पिण्यावरून काल्याचा गोट्यासोबत वाद झाला. काल्याने गोट्याला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी एकटा असल्यामुळे गोट्या तेथून निघून गेला. काल्या आपल्यावर हल्ला करेल, अशी भीती गोट्याला वाटली. दुपारी ३.३० वाजता काल्या आपल्या घरी एकटा होता. त्यावेळी गोट्या पीयूषसोबत तेथे पोहोचला. दोघांनी काल्याच्या छातीवर वार करून त्याचा खून केला. घटनेची माहिती मिळताच पारडीचे निरीक्षक कोटनाके तसेच सहायक पोलीस निरीक्षक मारुती शेळके घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना काल्याचा गोट्यासोबत वाद झाला होता अशी माहिती मिळाली. पोलिसांनी शोध घेऊन गोट्याला ताब्यात घेतले. त्याने पीयूषच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली. काल्यावर दोन वर्षांपूर्वी कळमन्यात जीवघेणा हल्ला झाला होता. त्यावेळी त्याच्या उजव्या हाताचा पंजा तुटला होता. त्यानंतर तो शांत झाला होता.

..............

Web Title: Murder of a criminal over an alcohol dispute