लग्न समारंभात आचाऱ्याची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:07 IST2020-12-27T04:07:11+5:302020-12-27T04:07:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पैशाच्या वादातून आचाऱ्याची त्याच्या साथीदारांनी निर्घृण हत्या केली. तर, दुसऱ्याला गंभीर जखमी केले. हुडकेश्वर ...

लग्न समारंभात आचाऱ्याची हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पैशाच्या वादातून आचाऱ्याची त्याच्या साथीदारांनी निर्घृण हत्या केली. तर, दुसऱ्याला गंभीर जखमी केले. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका डांगे सेलिब्रेशन हॉलमध्ये शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. यामुळे लग्न समारंभात प्रचंड खळबळ उडाली होती.
अखिलेश शामलाल मिश्रा (वय ३१) असे मृताचे नाव आहे तर जखमीचे नाव ओम उमेश मिश्रा आहे. कामठी मार्गावर तुकाराम नगरातील ते रहिवासी आहेत. हे दोघे स्वयंपाक बनविण्याचे काम करीत (आचारी) होते. आरोपी अनिल रूपचंद खोब्रागडे, तेजस दिगांबर शेंडे (दोघेही रा. शांतीनगर) आणि त्यांचा एक साथीदार हे तिघे कॅटरर्सचे काम करीत होते. आरोपींनी पोलिसांना सांगितलेल्या माहितीनुसार, मिश्राकडे त्यांचे पैसे होते. त्यावरून त्यांच्यात वाद सुरू होता. शुक्रवारी रात्री लग्न समारंभात मिश्रा स्वयंपाक बनवायला गेला होता. तेथे आरोपींनी त्याला पैशाची मागणी केली. कार्यक्रम आटोपल्यानंतर पैसे देतो, असे मिश्रा म्हणाला. त्यावरून आरोपींसोबत त्याची लॉनच्या किचनजवळ बाचाबाची सुरू झाली. आरोपींनी अखिलेश मिश्राच्या डोक्यावर काचेची बाटली फोडली. नंतर त्याला चाकूने भोसकले. अखिलेशला वाचवायला धावलेल्या ओम मिश्रावरही आरोपींनी हल्ला केला. त्यामुळे तो जबर जखमी झाला. या घटनेमुळे लग्न समारंभात एकच खळबळ निर्माण झाली. हुडकेश्वर पोलिसांना माहिती कळविण्यात आली. जखमींना मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी अखिलेशला मृत घोषित केले. दरम्यान, पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी अनिल खोब्रागडे आणि तेजस शेंडे या दोघांना अटक केली. त्यांच्या तिसऱ्या साथीदाराचा शोध घेतला जात आहे.