Murder by breaking into a house in Nagpur; Arguing with neighbors | नागपुरात घरात घुसून हत्या; शेजाऱ्यांशी वाद भोवला

नागपुरात घरात घुसून हत्या; शेजाऱ्यांशी वाद भोवला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेजाऱ्यांशी सुरू असलेल्या वादाचे पर्यवसान एकाच्या हत्येत झाले. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांढराबोडी परिसरात रविवारी रात्री हा थरार घडला. अशोक संतराम नहारकर (वय ४०) असे मृताचे नाव असून त्यांची हत्या करणाऱ्या आरोपीची नावे मुन्ना महातो, रामू ऊर्फ चुन्नी महातो आणि चेतन महातो आहेत. या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
मृत अशोक नहारकर आणि आरोपी मुन्ना हे एकमेकाच्या शेजारी राहतात. त्यांच्यात अनेक दिवसांपासून कुरबुरी सुरू होत्या. या पार्श्वभूमीवर, आरोपी मुन्ना, चुन्नी आणि चेतन महातो हे तिघे रविवारी रात्री १० च्या सुमारास दिनेश संतराम नहारकर यांच्या घरावर चालून गेले. त्यांनी दिनेशला अश्लील शिवीगाळ केली. तेरा भतिजा इतना बडा बदमाश हो गया क्या, असे म्हणून ते मोठमोठ्याने अश्लील शिवीगाळ करू लागले. दिनेशने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्याला बेदम मारहाण केली. वाद वाढू नये म्हणून दिनेश आपल्या घरात गेले आणि त्यांच्या घरच्यांनी आतून दार लावून घेतले.

आरोपींनी त्यांच्या दारावर लाथा मारून दार तोडले आणि आत गेले. आरोपी घरात तोडफोड करत असल्याचे पाहून दिनेश यांचे मोठे भाऊ अशोक नहारकर यांनी आरोपींना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी जवळचा चाकू काढून अशोक यांच्या छातीवर, पोटावर आणि हातावर घाव घातले. ते रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतरही आरोपी इतरांना धमकावत होते. आजूबाजूची मंडळी धावली. त्यानंतर आरोपी बाहेर निघाले. माहिती कळताच अंबाझरी पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यांनी तीनही आरोपींना ताब्यात घेतले.

Web Title: Murder by breaking into a house in Nagpur; Arguing with neighbors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.