राष्ट्रपिता व राष्ट्रसंतांचे ‘म्युरल’
By Admin | Updated: July 2, 2015 03:16 IST2015-07-02T03:16:07+5:302015-07-02T03:16:07+5:30
गांधीबाग उद्यान परिसरात महात्मा गांधी व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याशी चर्चा करतानाचे भव्य म्युरल लवकरच साकारणार आहे.

राष्ट्रपिता व राष्ट्रसंतांचे ‘म्युरल’
मनपा अर्थसंकल्पात तरतूद : गांधीबाग उद्यानात साकारणार
नागपूर : गांधीबाग उद्यान परिसरात महात्मा गांधी व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याशी चर्चा करतानाचे भव्य म्युरल लवकरच साकारणार आहे. यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात ४० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
गांधीबाग उद्यानात या थोर राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा साकाराव्या यासाठी राष्ट्रसंत तुकाडोजी महाराज यांचे छायाचित्रकार व सेवक गजाभाऊ भिसेकर हे २०१० सालापासून प्रयत्नशील होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. भिसीकर यांनी महाराजासोबत १९४५ सालापर्यत भजन सहकारी होते. गांधीबाग उद्यानाला ऐतिहासिक वारसा आहे. सर्वत्र तणावाचे वातावरण असताना देशात शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी तुकडोजी महाराज गांधीबाग येथे आठवभडाभर मुक्कामी होते. त्यानंतर शांतता प्रस्थापित होण्याला मदत झाली. तसेच महाराजांनी जगाला स्वच्छतेचा संदेश दिला. या उद्यानाला गांधीबाग नाव पडण्यामागे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे प्रयत्न आहेत. राष्ट्रसंतांनीच हे उद्यान उभारले, स्वच्छता केली आणि या उद्यानाला गांधीबाग असे नाव दिले. महात्मा गांधी यांच्या नावाने हे उद्यान आहे पण येथे त्यांचा गांधी यांचा पुतळा उभारण्यात आलेला नाही. तुकडोजी महाराज हे गांधी यांचे अनुयायी होते. ३० जानेवारी १९५३ रोजी राष्ट्रसंतांनी गांधीजींचा स्मृतिदिन नागपुरात मोठ्या प्रमाणात आयोजित केला. त्यासाठी त्यांनी तत्कालीन लेंडी तलाव परिसराची निवड केली. या परिसरात त्यावेळी खूप घाण होती आणि तेथे छोटासा तलाव होता. लोक येथे शौचासाठी येत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी, अनारोग्य पसरले होते. गांधीजी स्वच्छतेचे पुजारी होते. परिसर स्वच्छ आणि प्रसन्न ठेवण्यासाठी त्यांनी अनेकांना प्रेरित केले. त्यांच्या याच विचाराने प्रभावित होऊन राष्ट्रसंतांनी लेंडी तलाव परिसराची निवड त्यांच्या पुण्यतिथीसाठी केली राष्ट्रसंतांनी १५०० स्वयंसेवकांच्या सहकार्याने हा तलाव परिसर स्वच्छ केला. राष्ट्रसंतांचे सहकारी आणि ज्येष्ठ छायाचित्रकार गजानन भिसेकर यांच्या पुढाकाराने दरवर्षी येथे गांधीजींचा स्मृतीदिन साजरा केला जातो.
गांधीबाग नाव असूनही येथे त्यांचा पुतळा नसल्याची त्यांना खंत होती. यासाठी ते प्रयत्नशील होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. (प्रतिनिधी)
लवकरच कामाला सुरुवात
गांधीबाग उद्यानाला ऐतिहासिक वारसा आहे. राष्ट्रसंत तुकडोची महाराज येथे शांती सप्ताह आयोजित केला होता. त्यांनी स्वच्छतेचा संदेश दिला. अशा थोर पुरुषाविषयी नवीन पिढीला ज्ञान व्हावे यासाठी हा निर्णय घेतला आहे. मनपाच्या अर्थसंकल्पात यासाठी ४० लाखाची तरतूद केली असून काही महिन्यात हे काम पूर्णत्वास जाणार आहे.
-दयाशंकर तिवारी
सत्तापक्ष नेते ,मनपा
प्रयत्नांना यश आल्याचे समाधान
गांधीबाग नाव असूनही येथे गांधीजींचा पुतळा नाही. ऐतिहासिक वारसा असलेल्या या उद्यानात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुतळा उभारला जावा यासाठी २०१० सालापासून मागणी करीत आहे. अखेर या मागणीला यश आले आहे. यात दयाशंकर तिवारी यांनीही सहकार्याची भूमिका घेतली. याचे समाधान आहे.