‘मुन्नाभाई’ व त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल
By Admin | Updated: July 6, 2015 03:04 IST2015-07-06T03:04:11+5:302015-07-06T03:04:11+5:30
मेडिकलच्या स्त्री-रोग विभागाच्या वॉर्डात शुक्रवारी डॉक्टरचे ‘अॅप्रॉन’ घालून फिरणारा ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या बोगस डॉक्टरावर

‘मुन्नाभाई’ व त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल
मेडिकल : बोगस डॉक्टर प्रकरण
नागपूर : मेडिकलच्या स्त्री-रोग विभागाच्या वॉर्डात शुक्रवारी डॉक्टरचे ‘अॅप्रॉन’ घालून फिरणारा ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या बोगस डॉक्टरावर तर त्याला मदत करणाऱ्या इंटर्न विद्यार्थ्याच्या विरोधात अजनी पोलीस ठाण्याने गुन्हा नोंदविला आहे.
राहुल जनार्धन खंबाळकर (२५) रा. मून वॉर्ड नं. ९, जिल्हा चंद्रपूर असे त्या बोगस डॉक्टराचे नाव असून त्याला मदत करणारा युवराज लहरे(२४) रा. रायगड, छत्तीसगड असे आरोपीचे नाव आहे. मेडिकलमध्ये शुक्रवारी निवासी डॉक्टरांचा संप सुरू होता. परिणामी इंटर्नवर रुग्णसेवेची जबाबदारी सोपविण्यात आली. होती. त्यानुसार इन्टर्न युवराज लहरे याची ड्युटी वॉर्ड क्र.२२ मध्ये लावण्यात आली होती. परंतु युवराज याने आपल्या जागी ‘बीपीएमटी’ या पॅरामेडिकलचा विद्यार्थी असलेला राहुल खंबाळकर याला पाठविले. राहुल अॅप्रॉन घालून वॉर्ड क्र. २२च्या समोर फिरत होता. याचवेळी वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. रमेश पराते व मेडिकलचे जनसंपर्क अधिकारी डॉ. गिरीश भोयर राऊंड मारीत असताना राहुलच्या हालचालीवर संशय आला. त्यांनी त्याला जवळ बोलवून विचारणा केली. राहुलच्या गळ्यात ओळखपत्रही होते. त्याची चौकशी केली असताना राहुल उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. संशय अधिक बळावताच त्यांनी अधीक्षक कक्षाकडे चलण्यास सांगितले. त्याचवेळी राहुल पळायला लागला. डॉक्टरांनी आरडाओरड केली. सुरक्षा रक्षकांनी त्याचा पाठलाग केला असताना नागरिकांनी राहुलला पकडले आणि मेडिकल प्रशासनाच्या स्वाधीन केले. प्रशासनाने लागलीच अजनी पोलिसांना बोलावून बोगस डॉक्टर राहुलला पोलिसांच्या स्वाधीन केले. शुक्रवारी मेडिकल प्रशासनाकडून तक्रार करण्यात आलेली नव्हती. शनिवारी डॉ. भोयर यांच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपीविरुध्द गुन्हा नोंदविला आहे. (प्रतिनिधी)