अवैध बांधकामावर मनपा-नासुप्रचा हतोडा
By Admin | Updated: May 23, 2015 02:48 IST2015-05-23T02:48:56+5:302015-05-23T02:48:56+5:30
मनपा व नासुप्रच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सलग पाचव्या दिवशी शुक्रवारी अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू ठेवली.

अवैध बांधकामावर मनपा-नासुप्रचा हतोडा
नागपूर : मनपा व नासुप्रच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सलग पाचव्या दिवशी शुक्रवारी अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू ठेवली. मनपाच्या पथकाने संत्रा मार्केट येथील २५ दुकानासमोरील अतिक्रमण हटविले. कारवाईला विरोध केल्याने तणाव निर्माण झाला होता. दरम्यान नासुप्रच्या पथकाने पारडी भागातील सोनबानगर येथील नासुप्रच्या जागेवरील भंगार व जनावरांच्या गोठ्याचे अतिक्रमण हटविले.
सकाळी ११.३० च्या सुमारास मनपाच्या पथकाने सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील गीतांजली टॉकीज जवळील यादव हॉस्पिटल व माहेश्वरी इलेक्ट्रॉनिकच्या मालकांना तळमजल्यातील गोदामासंदर्भात नोटीस बजावून प्रत्येकी २५ हजारांचा दंड ठोठावला. दोन दिवसात अतिक्रमण हटविण्याची मुदत दिली. त्यानंतर भगवाघर चौकातील सरस्वती विद्यालयाजवळील पानठेला व धार्मिक स्थळालगतचे दोन अवैध शेड हटविण्यात आले. सायंकाळी ६.३० च्या सुमारास संत्रा मार्केट परिसरात अतिक्रमण कारवाई करताना भेदभाव करीत असल्याचा पथकावर आरोप करीत लोकांनी विरोध दर्शविला. जेसीबी व अधिकाऱ्यांना घेराव करून राम मंदिराच्या वळणावर असलेल्या एका खासगी ट्रॅव्हल्सचे अतिक्रमण हटविण्याची मागणी केली. यावरून वातावरण तापले होते. त्यामुळे पोलिसाना बळाचा वापर करावा लागला.(प्रतिनिधी)
नासुप्रने जागा मोकळी केली
पारडी भागात सोनबानगर मैदान येथे नासुप्रची ६ एकर जागा आहे. या जागेवर भंगार विक्रे ते व गोपालकांनी गोठा उभारला होता. येथील अतिक्रमण हटवून पथकाने साहित्य जप्त केले. तसेच साक्षी अपार्टमेंट येथील नागरिकांच्या तक्रारीवरून अपार्टमेंटच्या काही लोकांनी केलेले अनधिकृत बांधकाम हटविले. या संदर्भात १८ मे रोजी नोटीस बजावण्यात आली होती. नासुप्रचे विभागीय अधिकारी हसमुख सूचक व पथक प्रमुख वसंत कन्हेरे यांनी ही कारवाई केली. यासाठी पोलिसांची मदत घेण्यात आली.