मनपा आयुक्त मुंढेंना सीईओ पदावरून हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 09:03 PM2020-07-10T21:03:49+5:302020-07-10T21:58:05+5:30

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना नागपूर स्मार्ट अ‍ॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लि. (एनएसएससीडीसीएल) च्या मुख्य अधिकारी (सीईओ) पदावरून हटविण्याचा प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत बहुमताने मंजूर झाला. त्याच बरोबर सीईओचा प्रभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.

Municipal Commissioner Mundhe removed from the post of CEO | मनपा आयुक्त मुंढेंना सीईओ पदावरून हटविले

मनपा आयुक्त मुंढेंना सीईओ पदावरून हटविले

Next
ठळक मुद्देसंचालक मंडळाच्या बैठकीत बहुमताने घेतला निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका आयुक्ततुकाराम मुंढे यांना नागपूर स्मार्ट अ‍ॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लि. (एनएसएससीडीसीएल) च्या मुख्य अधिकारी (सीईओ) पदावरून हटविण्याचा प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत बहुमताने मंजूर झाला. त्याच बरोबर सीईओचा प्रभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत महापौर संदीप जोशी यांनी मागणी केली की सीईओ, संचालक नसतानाही गेल्या तीन महिन्यात मुंढे यांनी जे निर्णय घेतले, ते वैध आहेत किंवा नाही यावर केंद्र अथवा राज्य सरकारच्या अ‍ॅडव्होकेट जनरलचा कायदेशीर सल्ला घेण्यात यावा. संचालक मंडळाच्या पुढच्या बैठकीत त्या आधारावर निर्णय घ्यावा.
बैठकीनंतर पत्रकारांशी चर्चा करताना महापौर संदीप जोशी यांनी सांगितले की, प्रवीण परदेशी यांनी जे पत्र आयुक्त मुंढे यांना पाठविले होते, त्यात स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता की, संचालक मंडळाच्या बैठकीत रामनाथ सोनवणे यांचा राजीनामा ठेवावा. त्यानंतर बोर्डाच्या परवानगीने सीईओचा चार्ज घ्यावा. परंतु मुंढे यांनी असे केले नाही, ते आज समोर आले.
मनपा मुख्यालयातील स्मार्ट सिटीच्या कार्यालयात शुक्रवारी संचालक मंडळाची बैठक झाली. स्मार्ट सिटीचे चेअरमन प्रवीण परदेशी व केंद्राचे अवर सचिव (फायनान्स) दीपक कोचर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले. बैठकीत स्मार्ट सिटीचे संचालक म्हणून महापौर संदीप जोशी, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, स्थायी समिती अध्यक्ष पिंडू झलके, बसपाचे गटनेता वैशाली नारनवरे, शिवसेनेच्या मंगला गवरे, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, नासुप्रच्या सभापती शीतल उगले, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्यासह निमंत्रित संचालक उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार आयुक्त मुंढे बैठकीत स्वत:ची नियुक्ती योग्य असल्याचे वारंवार सांगत होते तर काही संचालकांनी ते सीईओ असल्यावर आक्षेप घेतले. बैठकीत चेअरमन परदेशी यांनी व्होटिंगच्या आधारावर सीईओंची निवड करावी, असे मत व्यक्त केले. शिवसेनेच्या मंगला गवरे सोडल्यास बहुतांश संचालकांनी पूर्णवेळ सीईओची गरज व्यक्त करीत, सध्या सीईओंचा प्रभार उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सोपवून, नवीन सीईओंच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू करावी, असे मत व्यक्त केले.

 सीईओंच्या निवडीसाठी व्होटिंग, शिवसेना मुंढे यांच्यासोबत
संचालक पिंटू झलके म्हणाले बैठकीत प्रवीण परदेशी यांनी सीईओंच्या निवडीसाठी व्होटिंग करावे, असे सांगितले. दरम्यान तुकाराम मुंढे यांनी स्वत:ला सीईओ बनविण्यात यावे, असे बैठकीत सांगितले. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी नियमानुसार पूर्णवेळ सीईओ रहावा, असे मत व्यक्त केले. सध्यापुरता उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सीईओंचा चार्ज देऊन, नवीन सीईओंच्या नियुक्तीसाठी जाहिरात देण्यात यावी. याचे समर्थन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, नासुप्र सभापती शीतल उगले यांनी केले. महापौर, सत्तापक्ष नेता, स्थायी समिती अध्यक्ष विरोधी पक्ष नेते, बसपाचे गटनेता वैशाली नारनवरे व काही संचालकांनी मोरोणे यांना प्रभार द्यावा, या बाजूने व्होटिंग केले. दीपक कोचर यांनी सुद्धा पूर्णवेळ सीईओ असावा, असे मत व्यक्त करीत, मोरोणे यांच्याकडे प्रभार देण्यात यावा या बाजूने कौल दिला. यावेळी मंगला गवरे यांनी मुंढे यांचे समर्थन केले, त्या म्हणाल्या की जो काही निर्णय घ्याल, तो नियमानुसार घ्यावा. बैठकीत सीईओंच्या शैक्षणिक अर्हतेबाबतही चर्चा झाली.

 चेअरमनच्या आदेशानुसारच सीईओचा पदभार सांभाळला - मुंढे
आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले की, चेअरमनच्या आदेशानुसारच सीईओ बनलो. तीन महिन्याच्या कार्यकाळात जे काही निर्णय घेतले, त्याबाबत त्यांना अवगतही केले. कचरा ट्रान्सफर स्टेशनच्या जागी बायोमायनिंगला निधी देण्याबाबतही त्यांना अवगत केले होते. प्रत्येक निर्णय नियमानुसारच घेतले. ज्या बिलावर आपत्ती घेण्यात आली, त्याला चेअरमन यांनी योग्य ठरविले होते. कुठल्याही बाबतीत मी चूक केली नाही.

 मौखिक आदेशावर कोणी सीईओ बनतो का? - जोशी
गेल्या २० दिवसापासून सत्तापक्ष जे सांगत आहे, ते आज खरे ठरले. चेअरमन प्रवीण परदेशी यांनी मुंढे यांना पदभार सांभाळण्यास सांगितले नव्हते. मौखिक आदेशाच्या आधारे कुणी सीईओ बनू शकत नाही. या प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे. तीन महिन्यात घेतलेल्या निर्णयावर कायद्याचा सल्ला घेण्याचे निर्देश दिले आहे. त्याच आधारे पुढचे पाऊल उचलण्यात येईल.

बैठकीतील महत्वाचे मुद्दे
 माजी सीईओ डॉ. रामनाथ सोनवणे यांचा राजीनामा संचालक मंडळाने स्वीकारला. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांना स्मार्ट सिटीचे डायरेक्टर नियुक्त केले.
बैठकीत मुंढे यांच्या विरुद्ध काही संचालकांनी आवाज उचलला. संचालकांनी आक्षेप घेतला की, तुकाराम मुंढे गेल्या तीन महिन्यापासून स्वत:ला संचालक म्हणून सांगत आहे तर बोर्ड आॅफ डायरेक्टरच्या मीटिंगमध्ये त्यांना संचालक बनविण्याचा प्रस्ताव का नाही आला.
 स्मार्ट सिटीच्या कंपनी सचिवाला नियम वाचून दाखविण्यास सांगितले. त्यांनी सांगितले की, कायद्यानुसार बोर्ड आॅफ डायरेक्टरच्या परवानगीनंतरच कुणी संचालक बनू शकतो. सीईओ पूर्णवेळ चार्जमध्ये असायला हवे.

मुंढे यांनी आता समन्वयाने वागावे : दटके
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे सीईओ नाहीत, ते खोटे बोलत आहेत हे आम्ही वारंवार सांगत होतो. ते आज स्पष्ट झाले. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एका अधिकाऱ्याची पाठराखण न करता, नियमांची संगत केली. गैरसरकारी दोन संचालकांनीदेखील कायद्याचीच बाजू घेतली. त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. मुंढे यांनी या पुढे संयमाने आणि समन्वयाने वागावे, असे मत भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके यांनी व्यक्त केले. स्थानिक स्वराज्य संस्थेचा गाडा हा लोकनियुक्त सदस्यांच्या सोबतीने हाकावा लागतो हे मुंढे यांनी समजून घ्यावे. आम्ही कुठल्या अधिकाऱ्याच्या विरोधात नाही, त्यांच्या कार्यपद्धतीच्या विरोधात आहोत. शहराच्या विकासासाठी त्यांनी कामाची पद्धत बदलावी, असे दटके म्हणाले.

Web Title: Municipal Commissioner Mundhe removed from the post of CEO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.