यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मुंडन व रास्तारोको
By Admin | Updated: June 5, 2017 17:55 IST2017-06-05T17:55:22+5:302017-06-05T17:55:22+5:30
संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला यवतमाळ जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मुंडन व रास्तारोको
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला यवतमाळ जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यवतमाळ शहरात शेतकऱ्यांनी मुंडन करून रस्त्यावर भाजीपाला फेकत शासनाचा निषेध केला. जिल्ह्यात ठिकठिकाणी रस्ता रोको करण्यात आल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
यवतमाळ शहरात शेतकरी न्याय हक्क समितीच्या नेतृत्वात बंदचे आवाहन करण्यात आले होते. सोमवारी सकाळी मोर्चा काढून व्यावसायिकांना प्रतिष्ठाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री मदन येरावार यांच्या घरापुढे शासनाचा निषेध करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या. तर हुतात्मा चौकात शेतकऱ्यांनी मुंडन केले. तसेच आर्णी नाका परिसरात रस्त्यावर भाजीपाला फेकून निषेध केला. नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील अर्जुना येथे शेतकऱ्यांनी सरण रचून शासनाचा अभिनव निषेध केला. शेतकरी-वारकरी संघटनेने केलेल्या या आंदोलनाने वाहतूक ठप्प झाली होती. भांबराजा येथे शेतकऱ्यांनी रस्त्यावर लाकडाचे ओंडके आणि बैल बांधून रस्ता रोको केला. यामुळे वाहतूक ठप्प होऊन तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यवतमाळ तालुक्यातील कोळंबी फाट्यावरही रस्ता रोको करण्यात आला. महागाव तालुक्यातील हिवरासंगम येथे शेतकऱ्यांनी धरणे दिले. उमरखेड, नेर, बाभूळगाव, कळंब, राळेगाव या तालुक्यातही शेतकरी आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठेत सोमवारी शुकशुकाट दिसत होता. आंदोलनादरम्यान जिल्ह्यात कुठेही अनुचित घटना घडली नाही. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.