मुंबईचा ठगबाज नागपुरात जेरबंद
By Admin | Updated: October 29, 2016 02:29 IST2016-10-29T02:29:09+5:302016-10-29T02:29:09+5:30
आयएएस आॅफिसर असल्याचे सांगून अनेकांना गंडा घालणाऱ्या मुंबईच्या एका ठगबाजास दिल्ली पोलिसांनी नागपुरात अटक केली.

मुंबईचा ठगबाज नागपुरात जेरबंद
आयएएस आॅफिसर असल्याची बतावणी : अनेकांना गंडा
नागपूर : आयएएस आॅफिसर असल्याचे सांगून अनेकांना गंडा घालणाऱ्या मुंबईच्या एका ठगबाजास दिल्ली पोलिसांनी नागपुरात अटक केली. विनय कुमार असे या ठगबाजाचे नाव असून तो मुंबई येथील रहिवासी असल्याचे समजते. या कारवाईला स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांकडून दुजोरा मिळू शकला नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, विनयकुमार सोशल मीडियावर स्वत:ला आयएएस अधिकारी असल्याचे सांगून सर्वसामान्यांना प्रभावित करतो. त्या आधारे संपर्कात आलेल्यांना गंडा घालतो. त्याने रत्नागिरी आणि रायगडमधील अनेक ठिकाणी ठगबाजी केल्याचे समजते. त्याने स्वत:च्या अनेक मुलाखतीही फेसबुकवर टाकलेल्या आहेत. त्याची झकपक शैली केंद्रीय सतर्कता विभागाच्या लक्षात आल्यानंतर चौकशी सुरू झाली. त्यात संबंधित नावाचा कोणताही अधिकारी आयएएस नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संबंधित विभागाने त्याच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यावरून त्याची चौकशी सुरू झाली.
तो नागपुरात दडून असल्याचे कळाल्याने दिल्ली पोलिसांचे एक विशेष पथक नागपुरात आले. या पथकाने आज विनयकुमारला ताब्यात घेऊन दिल्लीला नेल्याचे समजते. या संदर्भात स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता असल्या कोणत्याही कारवाईची माहिती नसल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)