मुंबई पोलिसांनी केली स्फोटक कंपनीकडे चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:09 IST2021-02-27T04:09:03+5:302021-02-27T04:09:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळच गुरुवारी दुपारी आढळलेल्या वाहनातील स्फोटके नागपुरात तयार झाल्याचे ...

मुंबई पोलिसांनी केली स्फोटक कंपनीकडे चौकशी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळच गुरुवारी दुपारी आढळलेल्या वाहनातील स्फोटके नागपुरात तयार झाल्याचे वृत्त पुढे आल्याने सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी या संबंधाने गुरुवारी रात्री कंपनी प्रशासनाशी संपर्क साधून प्रदीर्घ चौकशी केली आहे.
दरम्यान, कंपनीनेही या स्फोटकाचे उत्पादन तसेच खरेदी-विक्रीच्या प्रक्रियेसंदर्भात खुलासा केला आहे.
ज्या ठिकाणी स्फोटके भरलेले हे वाहन सापडले. त्याच्या जवळच्याच परिसरात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, लता मंगेशकर तसेच मुंबई महापालिकेच्या आयुक्तांचे निवासस्थान आहे. जिंदाल हाऊस आणि जसलोक हॉस्पिटलही आहे. त्यामुळे तेथे स्फोटके ठेवणाऱ्यांची चौकशी सुरू असतानाच ही स्फोटके नागपूर (बाजारगाव)च्या सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत तयार झाल्याचे तपासात उघड झाल्याने तपास यंत्रणांनी नागपूरकडेही नजर वळविली आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबईच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सोलारच्या प्रशासनासोबत गुरुवारी रात्री संपर्क साधला आणि प्रदीर्घ विचारपूस केली.
या संबंधाने ‘लोकमत’ने सोलार कंपनी प्रशासनाकडे विचारणा केली असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र, काय विचारणा झाली ते सांगण्यास नकार दिला. सोबतच कंपनीने एक प्रसिद्धीपत्रक दिले. त्यात उत्पादन आणि वितरणासंबंधीची संपूर्ण प्रकिया शासकीय यंत्रणेच्या देखरेखीखाली केली जात असल्याचे सांगितले. त्यांच्या माहितीनुसार, ‘२००८ च्या नियमानुसार, केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ इंडस्ट्री ॲन्ड पेट्रोलियम ऑफ सेफ्टी (पेसो) यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, कंपनीत उत्पादित केल्या जाणाऱ्या प्रत्येक स्फोटकाच्या उत्पादन आणि खरेदी-विक्रीची माहिती या विभागाच्या पोर्टलवर नोंदविली जाते. अधिकृत परवानाधारक कंपन्यांनातून ही स्फोटके दिली जातात. त्याची माहिती पोलिसांनाही दिली जाते. मुंबईत आढळलेली स्फोटके ही खु्ल्या स्वरूपात असल्याने ती कुणाकडून तेथे पोहोचली, त्याबाबतची चौकशी केली जात असल्याचेही कंपनीचे महाव्यवस्थापक सोमेश्वर मुंदडा यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
---
आमच्याकडे संपर्क नाही - पोलीस
या संबंधाने नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे संपर्क केला असता मुंबई पोलिसांकडून आमच्याशी अद्याप यासंबंधाने संपर्क झाला नसल्याचे या दोन्ही अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
----