मुंबई बॉम्बस्फोटातील कैदी असगर युसुफ मुकाद्दमचा अकस्मात पॅरोल नामंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2022 18:36 IST2022-04-02T17:21:48+5:302022-04-02T18:36:25+5:30
मुकाद्दमला टाडा या विशेष कायद्यांतर्गत शिक्षा झाली आहे. त्यामुळे संबंधित नियमानुसार तो अकस्मात पॅरोल मिळण्यासाठी अपात्र आहे, असे या निर्णयात स्पष्ट करण्यात आले.

मुंबई बॉम्बस्फोटातील कैदी असगर युसुफ मुकाद्दमचा अकस्मात पॅरोल नामंजूर
नागपूर : १९९३ मधील मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील कैदी असगर युसूफ मुकाद्दम (वय ५९) याची अकस्मात पॅरोल मागणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावली. न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला.
मुकाद्दमला टाडा या विशेष कायद्यांतर्गत शिक्षा झाली आहे. त्यामुळे संबंधित नियमानुसार तो अकस्मात पॅरोल मिळण्यासाठी अपात्र आहे, असे या निर्णयात स्पष्ट करण्यात आले. मुकाद्दमला विशेष सत्र न्यायालयाने टाडा कायद्यांतर्गत फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा रद्द करून त्याला मरेपर्यंत जन्मठेपेची सुधारित शिक्षा सुनावली. मुकाद्दमला १९ मार्च १९९३ रोजी अटक करण्यात आली होती. तो तेव्हापासून कारागृहात आहे.
त्याने ४५ दिवसांच्या अकस्मात पॅरोलकरिता १९ ऑगस्ट २०२० व १८ मे २०२१ रोजी नागपूर मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकांकडे अर्ज सादर केले होते. ते अर्ज अनुक्रमे २८ ऑगस्ट २०२० व २६ मे २०२१ रोजी नामंजूर करण्यात आले. त्यामुळे मुकाद्दमने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. अकस्मात पॅरोल नाकारण्याचा निर्णय अवैध असल्याचे त्याचे म्हणणे होते.