मुकुल वासनिक यांना रामटेकमधून लढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 20:14 IST2019-03-22T20:13:21+5:302019-03-22T20:14:32+5:30
रामटेक लोकसभा मतदार संघात पक्षाचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांना निवडणूक लढण्याचे आदेश राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी द्यावे, अशी मागणी प्रदेश आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत केली.

मुकुल वासनिक यांना रामटेकमधून लढवा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रामटेक लोकसभा मतदार संघात पक्षाचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांना निवडणूक लढण्याचे आदेश राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी द्यावे, अशी मागणी प्रदेश आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत केली.
वासनिक यांनी रामटेक लोकसभा मतदार संघात लोकसभेची निवडणूक लढवावी, अशी काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे. वासनिक लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक नसले तरी त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करीत राष्ट्रीय अध्यक्षांनी आदेश दिल्यास ते निवडणूक लढण्यास तयार होतील, अशी भावना प्रदेश काँग्रेसचे सचिव मुजीब पठाण, नाना गावंडे, उमरेड विधानसभा क्षेत्राचे प्रमुख संजय मेश्राम, ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केली.
वासनिक रामटेकचे खासदार असताना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली. प्रत्येक गावात त्यांचा जनसंपर्क आहे. अशावेळी पक्षाने नवा उमेदवार दिल्यास त्याला प्रचारात वेळ कमी मिळेल. शेवटी पक्ष जो आदेश देईल तो सर्वांना मान्य राहील. मात्र वासनिक हेच रामटेकसाठी अतिसक्षम उमेदवार असल्याचे नाना गावंडे यांनी स्पष्ट केले. वासनिक यांच्या मार्गदर्शनात गत पाच वर्षांत जिल्ह्यात काँग्रेसचे संघटन मजबूत झाले आहे. पक्ष कार्यकर्ता वासनिक यांच्या आदेशाच्या प्रतीक्षेत आहे, अशावेळी त्यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेऊन रामटेक लोकसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांना पोरके करू नये, असे मत मुजीब पठाण यांनी व्यक्त केले. पत्रपरिषदेला नागपूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा तक्षशीला वाघधरे, चंद्रपाल चौकसे, कुंदा राऊत, अॅड.नंदा पराते, बाबा आष्टनकर, भीमराव कडू, प्रसन्ना तिडके, उदयसिंग यादव, योगिता इटनकर, नरेश बर्वे, बाळू इंगोले आदी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादीही वासनिक यांच्यासाठी आग्रही
वासनिक यांनी रामटेकमधून निवडणूक लढवावी यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी आग्रही आहे. यासंदर्भात त्यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे भावना व्यक्त केल्या असल्याचे नाना गावंडे यांनी सांगितले.