मुकेश शाहू पुन्हा गजाआड
By Admin | Updated: November 20, 2015 03:23 IST2015-11-20T03:23:06+5:302015-11-20T03:23:06+5:30
खंडणी वसुली आणि विनयभंगाच्या एकापाठोपाठ अनेक तक्रारी असलेला मुकेश जयदेवप्रसाद शाहू (रा. सोनबानगर) याला कळमना पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी अटक केली.

मुकेश शाहू पुन्हा गजाआड
खंडणी वसुली : दुकानदाराचा गल्ला लुटल्याचा आरोप
नागपूर : खंडणी वसुली आणि विनयभंगाच्या एकापाठोपाठ अनेक तक्रारी असलेला मुकेश जयदेवप्रसाद शाहू (रा. सोनबानगर) याला कळमना पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी अटक केली. विशेष म्हणजे, तो आजच कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता.
महिलेला तिच्या संपत्तीचा वाटा मागतानाच बेदम मारहाण करण्याच्या आरोपावरून कळमना पोलिसांनी त्याला यापूर्वी अटक केली होती. त्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला कारागृहात डांबण्यात आले. यानंतर त्याच्याविरुद्ध अनेक पीडितांनी मारहाण, खंडणी मागणे आणि विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. अशाच प्रकारे १० नोव्हेंबरला ताजश्री बॅटरी(पारडी नाका)चे संचालक सजीद अली ऊर्फ राजूभाई वाहीद अली (वय ३८,रा.आदर्शनगर,नंदनवन)यांनी कळमना ठाण्यात तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनुसार, आरोपी मुकेश शाहू जानेवारी २०१५ पासून धाक दाखवून सजीद अली यांच्याकडून दर महिन्याला दोन हजारांची खंडणी घेत होता. घटनेच्या दिवशी मुकेश आणि त्याचा साथीदार विनोद गुप्ता (रा. पाचपावली) सजीद यांच्या दुकानात आला. तुला धंदा करायचा असेल तर यापुढे पाच हजार रुपये महिना खंडणी द्यावी लागेल, असे सांगून चाकूच्या धाकावर सजीद यांच्या दुकानाच्या गल्ल्यातील चार हजार रुपये हिसकावून नेले. त्यानंतर मुकेश आणि त्याचा साथीदार दरमहा पाच हजार रुपये खंडणी वसूल करीत होता, असे तक्रारीत नमूद केले. या तक्रारीवरून कळमन्याचे ठाणेदार सुनील बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपी मुकेश आणि विनोदविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.(प्रतिनिधी)