वसीम कुरैशी
नागपूर : भारताची ध्वजवाहक विमान सेवा कंपनी एअर इंडियाचे खासगीकरण होत आहे. यादरम्यान उपकंपनी एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (एआयईएसएल) अचल संपत्तीच्या हस्तांतरणासह वेगळी कंपनी बनली आहे. कंपनीचा शॉर्ट फॉर्म एआयईएसएल आहे, पण त्यासमोरील दोन अक्षरे ‘एआय’चे पूर्ण नाव आता ‘एअर इंडिया’ म्हणून लिहिले जात नाही.
एअर इंडियाच्या नावाची ब्रॅण्ड व्हॅल्यू पाहता त्याचा शॉर्ट फॉर्म एआय ठेवण्यात आला आहे, पण पूर्ण अक्षरात एअर इंडिया लिहिण्यात येणार नाही. नाते तुटल्यानंतरही मुख्य कंपनीचे नाते शॉर्ट कटमध्ये दिसून येत आहे. एअर इंडियामध्ये दिसून येणारा ‘महाराजा’ एमआरओमध्ये दिसून येत नाही. विमानांमध्ये सेंटोर आणि कोणार्क चक्रासह उडत्या हंसाची आकृती असणारे काही विमान येथे दुरुस्तीसाठी येतात. पण पुढे लोगो राहणार वा नाही, हे आता सांगता येणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.
बोईंग कंपनीने नागपुरात एमआरओची निर्मिती केली होती. त्यावेळी एमआरओचे नाव बोईंग एअर इंडिया एमआरओ होते. त्यानंतर २०१४ मध्ये बोईंगने एमआरओ एअर इंडियाला हस्तांतरित केले. त्यानंतर हा एमआरओ एअर इंडियाने उपकंपनीला सोपविला. एअर इंडियाच्या नावात आणि लोगोमध्ये बदल होणे, ही नवीन गोष्ट नाही. काही वर्षांपूर्वी या विमान कंपनीचे नाव नॅशनल एव्हिएशन कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड करण्यात आले होते. दोन ते तीन वर्षांतच परत एअर इंडिया हेच जुने नाव ठेवण्यात आले. २००७ मध्ये इंडियन एअरलाईन्सला एअर इंडियामध्ये विलिन करण्यात आले होते. एअर इंडिया ट्रान्सपोर्ट कंपनी लिमिटेडसुद्धा (एआयटीसीएल) आता एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड बनली आहे. यामध्येही एआयचा कोणताही फूल फॉर्म नाही.