एमआरआय, सिटी स्कॅन कागदावरच

By Admin | Updated: June 13, 2017 01:49 IST2017-06-13T01:49:56+5:302017-06-13T01:49:56+5:30

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) ‘एमआरआय’ यंत्रच नाही.

MRI, City scan paper | एमआरआय, सिटी स्कॅन कागदावरच

एमआरआय, सिटी स्कॅन कागदावरच

मेयोतील रुग्ण अडचणीत : दोन महिन्यांपासून कालबाह्य सिटी स्कॅनही बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) ‘एमआरआय’ यंत्रच नाही. कालबाह्य झालेले सिटी स्कॅनही गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. परिणामी, गरीब रुग्णाला पदरमोड करुन बाहेरून निदान करावे लागत आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही यंत्राच्या खरेदीसाठी १७ कोटी ५० लाख रुपयांना प्रशासकीय मंजुरी मिळाली. विधिमंडळात चर्चाही झाली. परंतु आर्थिक तरतूद न झाल्याने हे दोन्ही यंत्र अद्यापही कागदावरच आहेत.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांच्या आरोग्याचा आधार म्हणून मेयोची गणना होते. सर्वांत मोठी आरोग्य यंत्रणा म्हणून ही संस्था विदर्भच नव्हे तर मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या रुग्णांना आधार वाटते. मात्र येथील अपुऱ्या सोईसुविधा आणि अद्ययावत उपचार तंत्राच्या अभावामुळे रुग्णांसाठी नवे दुखणे ठरत आहे. आजची उपचार पद्धती ही तंत्रावर ठरत असताना या तंत्राच्या बाबती मात्र मेयो पिछाडीवर पडले आहे. रोगाचे अचूक निदान करताना अडथळे येत आहेत. गरिबांचा जीव धोक्यात आला आहे. या दोन्ही यंत्राच्या खरेदीसाठी मेयो प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी प्रस्ताव पाठविला होता. त्याला नोव्हेंबर २०१६ रोजी मंजुरी मिळाली. यात ‘१.५ टेस्ला एमआरआय’साठी १० कोटी तर ‘१२८ स्लाईस सिटी स्कॅन’साठी ७ कोटी ५० लाखांना प्रशासकीय मंजुरी मिळाली. तसे पत्रही प्राप्त झाले. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात या यंत्राला घेऊन चर्चाही झाली. परंतु अद्यापही निधी मिळाला नाही. उलट एमआरआय व अद्ययावत सिटी स्कॅन नसल्याने रेडिओलॉजी विभागाच्या पदव्युत्तर (पीजी) पदविका अभ्यासक्रमाच्या ‘डीएमआरडी’ विद्यार्थ्यांच्या दोन जागा वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) रद्द केल्या.

कधी थांबणार धावाधाव
मेयो रुग्णालयात दोन महिन्यांपासून सिटी स्कॅन बंद असून ‘एमआरआय’ही नसल्याने येथील रुग्णांना मेडिकलमध्ये पाठविले जाते. रोज आठ ते दहा रुग्णांवर अशी धावपळ करण्याची वेळ येते. परंतु मेडिकलमध्ये आधीच रुग्णांची गर्दी राहत असल्याने या रुग्णांवर कित्येक तासांची प्रतीक्षेची वेळ येते. अनेकवेळा रुग्णाला दुसऱ्या दिवसाची तारीख देऊन परत पाठविले जाते.

Web Title: MRI, City scan paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.