लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एमपीडीएमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून फरार असूनही चोऱ्या करीत असलेल्या कुख्यात अक्षय भैसारे (२७) रा. कळमना याला गुन्हे शाखा पोलिसांनी एका साथीदारासह अटक केली. त्याला छत्तीसगड येथील भाटापाराच्या बालोदा बाजारात पकडण्यात आले. मोनीश ऊर्फ लाला नारायण मेश्राम (२८) रा. रमानगर असे त्याच्या साथीदाराचे नाव आहे.
अक्षयच्या विरोधात ५० पेक्षा अधिक चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या विरोधात सहा महिन्यांपूर्वी एमपीडीएची कारवाई सुरू करण्यात आली होती. याचा सुगावा लागताच तो फरार झाला होता. परंतु फरार असूनही तो शहरात चोऱ्या करीत हाेता. चोरीच्या ९ प्रकरणातही पोलीस त्याचा शोध घेत होते.
दरम्यान, अक्षयचा साथी लाला पोलिसांच्या हाती लागला. तेव्हा अक्षय भाटापारात असल्याची माहिती मिळाली. एक पथक तिथे पाठवून त्याला पकडण्यात आले. त्याने चोरीच्या ७ प्रकरणांचा खुलासा केला आहे. दोघांनाही कोठडीत घेऊन विचारपूस केली जात आहे. ही कारवाई पीआय किशोर पर्वते, पीएसआय एम.पी. मोहेकर, लक्ष्मीछाया तांबुस्कर, एएसआय मोहन साहू, हवालदार संतोष मदनकर, राम नरेश यादव, अनिल पाटील, रवी साहू, सुहास शिंगणे, शेषराव राऊत, योगेश गुप्ता, सूरज भोंगाडे आणि कमलेश गहलोद यांनी केली.