नागपुरात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच
By Admin | Updated: June 4, 2017 01:51 IST2017-06-04T01:51:38+5:302017-06-04T01:51:38+5:30
किसान क्रांतीने पुकारलेला शेतकऱ्यांचा संप मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला असला ...

नागपुरात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच
जय जवान जय किसानही उतरले आंदोलनात : रस्त्यावर दूध फेकून शासनाचा निषेध
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : किसान क्रांतीने पुकारलेला शेतकऱ्यांचा संप मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी नागपुरात मात्र शेतकऱ्यांचा संप तिसऱ्या दिवशीही सुरूच होता. या आंदोलनात आता जय जवान जय किसान संघटनेने उडी घेत कॉटन मार्केट चौकात आंदोलन केले.
नागपुरात हे आंदोलन संपण्याऐवजी यात आणखी नवीन संघटना सहभागी झाल्या असून तिसऱ्या दिवशी जय जवान जय किसान या संघटनेचे प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात पवार अमृत महोत्सव समिती आणि युवा स्वाभिमान पार्टीतर्फे कॉटन मार्केट चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी तब्बल तीन हजार लिटर दूध रस्त्यावर फेकून शासनाचा निषेध करण्यात आला. आंदोलनात प्रशांत पवर यांच्यासह दुनेश्वर पेठे, अरुण वानकर, शेखर बोरसे, संतोष विश्वकर्मा, प्रकाश मेश्राम, राजू भोयर, रियाज शेख, शरद शाहू, बंटी फलके, पंकज मरसकोल्हे आदींचा समावेश होता.
दिलेला शब्द पाळा : राजेंद्र मुळक
केंद्र आंणि राज्याची सत्ता मिळविण्यासाठी भाजपने शेतकऱ्यांना जो शब्द दिला होता त्याचे पालन करा, शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे, अशी मागणी नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी केली आहे. लहान शेतकरी, मोठा शेतकरी ही सरकारची भाषा शेतकऱ्यांचे आंदोलन कमजोर करणारी आहे. शेतकऱ्यांमध्ये फूट पाडणारी आहे. शेतकऱ्यांनी हा शासनाचा कपटी स्वभाव ओळखावा आणि सरसकट कर्जमाफी घेण्यासाठी कटिबद्ध राहावे, असे आवाहनही राजेंद्र मुळक यांनी केले आहे.