एनआयटी मेट्रो रिजन आराखड्याविरुद्ध आंदोलन

By Admin | Updated: April 26, 2015 02:29 IST2015-04-26T02:29:36+5:302015-04-26T02:29:36+5:30

नागपूर सुधार प्रन्यासच्या (नासुप्र) मेट्रो रिजन आराखड्याविरुद्ध जय जवान-जय किसान संघटना तीव्र आंदोलन करणार

Movement against NIT Metro Region Plan | एनआयटी मेट्रो रिजन आराखड्याविरुद्ध आंदोलन

एनआयटी मेट्रो रिजन आराखड्याविरुद्ध आंदोलन

नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासच्या (नासुप्र) मेट्रो रिजन आराखड्याविरुद्ध जय जवान-जय किसान संघटना तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती संघटनेचे प्रमुख प्रशांत पवार यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.
नासुप्रचा विकास आराखडा जाचक असून शेतकऱ्यांसाठी घातक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारांची पायमल्ली करणारा आहे. या आराखड्याविरुद्ध सुमारे ६ हजार ५०० आक्षेप नोंदविण्यात आले आहे. त्यापैकी ४५०० पेक्षा जास्त आक्षेप जय जवान-जय किसानच्या लोकप्रबोधनामुळे झालेले आहेत. विकास आराखडा इंग्रजीत व तांत्रिक स्वरुपाचा असल्यामुळे नागरिकांना समजण्यास कठीण आहे. विकास आराखडा काय, याची लोकांना माहिती नाही. संघटना गावागावात जाऊन प्रत्येक सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांना माहिती देऊन जनसुनावणीच्या वेळेस सर्वांना उपस्थित करून या आराखड्याचा एकजुटीने विरोध करणार आहे. पवार म्हणाले, नासुप्र कंपोस्ट डेपोचे आरक्षण रद्द करून ६०० कोटी रुपयांचा मलिदा घशात घालणार आहे. प्रत्येक भूखंडधारकाकडून प्रति चौ.फूट ६० रुपये विकास शुल्क घेणार आहे. यातून नासुप्र ३६० कोटी गोळा करणार आहे.
संघटनेने १२२ एकर विकासाचा खर्च काढल्यानंतर प्रत्येक भूखंडधारकाला ५ ते १० हजार रुपये भरावे लागेल.
नासुप्रच्या अवाजवी शुल्काला भूखंडधारकांनी विरोध करावा, असे संघटनेचे आवाहन आहे. नासुप्रने वर्धा मार्गावरील शेतजमिनी १५ दिवसांआधीच ग्रीन बेल्टमध्ये आरक्षित करून शेतकऱ्यांच्या जमिनी बिल्डर्सच्या घशात टाकण्याचा नासुप्र डाव आहे. शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार संपुष्टात येणार आहे. नासुप्रच्या आजपर्यंतच्या कामाचा लेखाजोखा संघटना मागणार आहे.
पत्रपरिषदेत संघटनेचे विजयकुमार शिंदे, रविशंकर मांडवकर, सुभाष बांते, अरुण बनकर, कार्यकर्ते व समस्याग्रस्त भूखंडधारक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Movement against NIT Metro Region Plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.