मानकापूर फरस चौकात वाहतूक सिग्नल लावा
By Admin | Updated: February 8, 2015 01:16 IST2015-02-08T01:16:56+5:302015-02-08T01:16:56+5:30
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे कोराडी रोडवर मानकापूर येथे उभारलेला उड्डाण पूल टाकळी फरस चौकात उतरतो व तेथूनच दुसरा रेल्वे उड्डाण पूल सुरू होतो. उड्डाण पुलावरून

मानकापूर फरस चौकात वाहतूक सिग्नल लावा
मनसे उतरली रस्त्यावर : विजेच्या खांबांचे लिलाव करू
नागपूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे कोराडी रोडवर मानकापूर येथे उभारलेला उड्डाण पूल टाकळी फरस चौकात उतरतो व तेथूनच दुसरा रेल्वे उड्डाण पूल सुरू होतो. उड्डाण पुलावरून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे टाकळी फरस चौकात उपघातांचे सत्र सुरू आहे. या चौकात सिग्नल लावून भरधाव वाहतुकीवर नियंत्रण लावण्याची स्थानिक नागरिकांची मागणी आहे. मात्र, सिग्नल कुणी लावावा या विषयावर महापालिका व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची एकमेकांकडे टोलवाटोलवी सुरू आहे, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अंत्ययात्रा काढून अभिनव आंदोलन केले.
लोकमतने ‘मानकापूर उड्डाण पूल झाले अॅक्सिडेट पॉर्इंट’ या शिर्षकांतर्गत शुक्रवारी वृत्त प्रकाशित केले होते, हे विशेष. शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मानकापूर फरस चौकात एकत्र आले आणि निदर्शने करू लागले. मानकापूर उड्डाण पूल चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आल्याने मानकापूर फरस चौकात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यासाठी मनपा अधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरीत त्यांच्या निषेधार्थ प्रतिकात्मक अंत्ययात्रा सुद्धा काढण्यात आली. आंदोलनादरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महानगरपालिकेचे अधिकारीसुद्धा आंदोलनस्थळी पोहोचले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी त्यांना निवेदन सादर करीत वाहतूक सिग्नल लावण्याची मागणी केली. यादरम्यान स्वाक्षरी अभियानसुद्धा राबविण्यात आले. मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष चंदू लाडे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात मनसेचे राज्य उपाध्यक्ष हेमंत गडकरी प्रामुख्याने उपस्थित होते. आंदोलनात श्याम पुण्यानी, दिनेश इलमे, हर्षल धर्माळे, अभिजित याहूल, मनोज कहाळकर, शुभम तिळगुळे, अनुराग राघोर्ते, प्रसाद मुजुमदार, अंकित दुबे आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)