मोतीबाग खून प्रकरण ; सहा जण निर्दोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2016 02:43 IST2016-08-10T02:43:49+5:302016-08-10T02:43:49+5:30

बहुचर्चित मोतीबाग फुटबॉल ग्राऊंड येथील खून खटल्यातून अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी.एस.अकाली यांच्या न्यायालयाने ....

Moti Bagh murder case; Six people innocent | मोतीबाग खून प्रकरण ; सहा जण निर्दोष

मोतीबाग खून प्रकरण ; सहा जण निर्दोष

नागपूर : बहुचर्चित मोतीबाग फुटबॉल ग्राऊंड येथील खून खटल्यातून अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी.एस.अकाली यांच्या न्यायालयाने सहा आरोपींची सबळ पुराव्याअभावी संशयाचा लाभ देऊन निर्दोष सुटका केली.
रवी मनोहर पाटील (३३) रा. इंदोरा मॉडेल टाऊन , अभिजित चंद्रशेखर मेश्राम (४१) रा. मोहननगर खलासी लाईन, कामेश गोपाल मुदलियार (३७) रा. मिसाळ ले-आऊट, अमोल ऊर्फ पिंटू राजू मून (२८) रा. इंदोरा, दिनेश अर्जुन चंद्रिकापुरे (३१) आणि अजय धनसिंग उईके (२७) दोन्ही रा. इंदोरा, अशी आरोपींची नावे आहेत. मयूर कैलाश जांभूळकर, असे मृताचे नाव होते. तो ‘चेन स्नॅचर’ होता आणि इंदोरा येथीलच रहिवासी होता. सरकार पक्षानुसार मृत मयूर आणि रवी पाटील यांचे आपसांत वैमनस्य होते. अनेकदा रवी पाटीलने त्याला मारहाण केली होती. इमारतीच्या छतावरून फेकण्याचा प्रयत्नही केला होता.
१ जानेवारी २०१४ रोजी सकाळी मोतीबाग फुटबॉल मैदानातील विहिरीत मयूर जांभूळकरचा मृतदेह आढळून आला. शरीरावर अनेक ठिकाणी धारदार व तीक्ष्ण शस्त्राच्या जखमा झाल्या होत्या. सहायक पोलीस निरीक्षक वैशाली ढाले यांच्या तक्रारीवरून पाचपावली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविच्या ३०२,२०१ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मृताची आई निर्मला जांभुळकर यांनी व्यक्त केलेल्या संशयावरून आणि मृतासोबतच्या जुन्या वैमनस्यावरून आरोपी रवी पाटीलसह सहा जणांना अटक करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर यांनी तपास करून भादंविच्या ३०२, २०१, १४३,१४७, १४८, १४९, १२० ब कलमांतर्गत आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. बचाव पक्षाचा असा युक्तिवाद होता की, परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे हे प्रकरण होते. परंतु सरकार पक्ष पुराव्यांची साखळी जुळवण्यात अपयशी ठरला. मृत मयूरविरुद्ध चेनस्नॅचिंगचे बरेच गुन्हे होते. त्याच्या पोटात खूप दारूही सापडली होती. त्यामुळे पोलिसांनी मयूरच्या सहआरोपींची चौकशी करायला हवी होती. आधी आरोपींना अटक करण्यात आली व नंतर पुरावे जुळवण्यात आले असे वाटते.
न्यायालयाने संपूर्ण परिस्थितीचा विचार करून सर्व आरोपींना संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्त केले. न्यायालयात आरोपीतर्फे अ‍ॅड. चंद्रशेखर जलतारे, अ‍ॅड. रमेश रावलानी आणि अ‍ॅड व्ही. एन. बन्सोड यांनी काम पाहिले.(प्रतिनिधी)

 

Web Title: Moti Bagh murder case; Six people innocent