मुलाला जगविण्यासाठी आईची धडपड

By Admin | Updated: August 17, 2016 02:27 IST2016-08-17T02:27:17+5:302016-08-17T02:27:17+5:30

अपघातात गंभीर जखमी झालेल्या एकुलत्या एक तरुण मुलाला वाचविण्यासाठी चंद्रपूर येथून नागपूर गाठले.

Mother's struggle for survival of the child | मुलाला जगविण्यासाठी आईची धडपड

मुलाला जगविण्यासाठी आईची धडपड

मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर उपचारासाठी संघर्ष :
निखिलला हवे जगण्याचे बळ
नागपूर : अपघातात गंभीर जखमी झालेल्या एकुलत्या एक तरुण मुलाला वाचविण्यासाठी चंद्रपूर येथून नागपूर गाठले. मित्र नातेवाईकांकडून उसनवारी घेऊन उपचार सुरू केले. मेंदूवर शस्त्रक्रिया झाली. गेल्या १५ दिवसांपासून तो व्हेंटिलेटरवर आहे. परंतु रोजचा २५ हजाराचा खर्च न झेपणारा. पैसे कमी पडत असल्याचे पाहत दागिनेही विकले. आता हातचे संपले. मुलाला वाचविण्यासाठी आणखी एक महिना तरी उपचार घेणे आवश्यक आहे. यासाठी चार लाखांची गरज असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. परंतु आतापर्यंत उपचारावर झालेल्या खर्चामुळे त्या कुटुंबाची परिस्थिती राहिली नाही. मुलाला जगवावे तरी कसे, या चिंतेने या गरीब कुटुंबाचे जीणे हराम झाले आहे.
मुलाच्या उपचारासाठी काही करण्याची जिद्द बाळगून असलेल्या आईचे नाव मंदा डांगे. नेरी, तहसील चिमूर, जिल्हा चंद्रपूर येथील ते रहिवासी आहेत. पती ज्ञानेश्वर शेतमजूर आहेत. घराला हातभार लागावा म्हणून मंदा या मोलकरणीचे काम करतात. २७ जुलै रोजी त्यांचा मुलगा निखिल (वय २३) याला एका वाहनाने जोरदार धडक दिली. यात मेंदूला जबर दुखापत झाली. या अपघाताने डांगे कुटुंबावर कुऱ्हाड कोसळली. निखिलला वाचविण्यासाठी आईची धडपड सुरू आहे. पण दारिद्र्यासमोर तिचे सर्व प्रयत्न थिटे पडत आहे.
सामाजिक कार्यकर्ता असलेल्या डॉ. अश्विनी सुरकार यांच्यासोबत मंदा डांगे यांनी गुरुवारी ‘लोकमत’ गाठून मदतीची अपेक्षा व्यक्त केली. त्या म्हणाल्या, निखिलला अपघात झाला तेव्हा तो नाही वाचणार असे सर्वच जण म्हणत होते. परंतु मी हिंमत हरली नाही, त्याला नागपूरच्या मेडिकलमध्ये आणले. येथे त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया झाली. परंतु प्रकृतीत सुधारणा होत नव्हती.
मुलाला वाचविण्यासाठी दागिने गहाण टाकले. गावकरीही धावून आले. त्यांच्या मदतीने त्याला धंतोली येथील ‘न्यूरॉन’ हॉस्पिटलमध्ये भरती केले. गेल्या १५ दिवसांपासून तो व्हेंटिलेटरवर आहे. औषधे व रुग्णालयाचा असा रोजचा खर्च मिळून २५ हजार रुपये येत आहे. आतापर्यंत साडेतीन लाख रुपये खर्च आला आहे, तो कसातरी केला. डॉक्टरांनी त्याला आणखी दहा दिवस व्हेंटिलेटरवर आणि महिनाभर तरी रुग्णालयात उपचारासाठी ठेवावे लागणार असल्याचे सांगितले. याला चार लाख रुपये खर्च येणार असल्याचेही सांगितले. परंतु आता हातचे सर्वच संपले आहे. समाजाचे आर्थिक पाठबळ मिळाल्यास मुलगा वाचेल, ही एकमेव आशा आहे, असेही त्या म्हणाल्या.(प्रतिनिधी)
हवा माणुसकीचा धर्म
एकुलत्या एक मुलाचा उतरत्या वयात आधार होईल एवढीच अपेक्षा बाळगून डांगे कुटुंब कसेतरी दिवस काढत होते. परंतु नियतीचे चक्र फिरले आणि काही कळण्याच्या आतच कठोर आघात सोसण्याची वेळ आली. त्यांना गरज आहे ती समाजाच्या मदतीच्या हाताची. हीच मदत या कुटुंबाला पुन्हा एकदा लढण्याचे बळ-जगण्याची उभारी देऊ शकते. निखिल डांगे यांना मदत करू इच्छिणाऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ता असलेल्या डॉ. अश्विनी सुरकार यांच्या भारतीय स्टेक बँक, शाखा सावनेर, अकाऊंट नंबर २०१६३५६४४७३ आयएफएससी : एसबीआयएन०००१२५२ यावर धनादेश अथवा धनाकर्ष पाठवून मदत करावी. अधिक माहितीसाठी ९७३०७००२८३ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

 

Web Title: Mother's struggle for survival of the child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.