मातृशक्तीद्वारेच भारत विश्वगुरू बनेल
By Admin | Updated: December 25, 2016 02:54 IST2016-12-25T02:54:38+5:302016-12-25T02:54:38+5:30
साधनशक्तीचे सामर्थ्य जिच्या अंगी आहे ती देवी दुर्गा, क्रियाशक्तीचे रूप असलेली देवी महालक्ष्मी आणि सकलजनांना आपल्या

मातृशक्तीद्वारेच भारत विश्वगुरू बनेल
सुमित्रा महाजन : विश्व मांगल्याच्या निर्मितीसाठी धर्मपीठाचे मातृसंसदेला साकडे
शफी पठाण नागपूर
साधनशक्तीचे सामर्थ्य जिच्या अंगी आहे ती देवी दुर्गा, क्रियाशक्तीचे रूप असलेली देवी महालक्ष्मी आणि सकलजनांना आपल्या ज्ञानरुपी आशीर्वादाने समृद्ध करणारी देवी सरस्वती या तिन्ही मातृशक्ती आहेत. आजच्या आधुनिक पिढीला याच मातृशक्तीच्या संस्कारशील मार्गाने पुढे नेले तर आपला भारत विश्वगुरू बनेल व तसा तो बनविण्याचे सामर्थ्य मातृशक्तीत आहे, अशा शब्दात लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी अवघ्या सृष्टीच्या सृजनशक्तीचा गौरव केला. विश्व मांगल्याच्या निर्मितीसाठी धर्मसंस्कृती महाकुंभात शनिवारी आयोजित मातृसंसदेत त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.
याप्रसंगी या धर्मपीठावर ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती, काशी सुमेरुपीठाचे पीठाचार्य स्वामी नरेंद्रनंद महाराज, राष्ट्रीय निमंत्रक जितेंद्रनाथ महाराज, गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, पुष्टिमार्गीय वैष्णव संप्रदायाचे आचार्य ब्रजराजकुमार महोदय, गौरक्षा पीठाचे प्रमुख व खासदार योगी आदित्यनाथ, भगवान हम्पीपीठाचे श्री विद्यारण्य भारती महाराज, स्वामी रामानुजाचार्य फलाहारी बाबा, राष्ट्रीय सेविका संघाच्या प्रमुख शांता अक्का, संस्कार भारतीच्या अध्यक्ष कांचन गडकरी, समाजसेविका कुंदाताई गणोरकर, साध्वी प्रज्ञाभारती भोपाल, साध्वी विभानंद गिरी, जबलपूर, जयताई पाटील, वेदमूर्ती कृष्णशास्त्री आर्वीकर व देशभरातील विविध पंथांच्या विचारधारेचे प्रतिनिधित्व करणारे संत उपस्थित होते. स्त्रीचे सामर्थ्य विशद करताना लोकसभाध्यक्षांनी प्राचीन गं्रथांचे अनेक दाखले दिले. आपला देश कृषिप्रधान आहे. या देशाला विकासाचे नवे परिमाण आज लाभत आहेत यात महिलांचे योगदान खूप मोठे आहे. आज जगातील अनेक देश भारताकडे नेतृत्वाच्या अपेक्षेने बघत आहेत. त्याचे कारण भारताने कधीही कोणत्या राष्ट्रावर आक्रमण करून सत्ता मिळवली नाही. भारताने नेहमी संयमाच्या संस्कारांचा पुरस्कार केला. विधायक संस्कारांचा हाच क्रम पुढे नेण्यासाठी महिलांनी स्वयंप्रेरणेने नेतृत्व स्वीकारणे आवश्यक आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.