मम्मीने बुलाया है...
By Admin | Updated: September 4, 2014 00:58 IST2014-09-04T00:58:58+5:302014-09-04T00:58:58+5:30
मम्मीने क्लिनिकमध्ये बोलवल्याचे कळल्यामुळे युगने दुसऱ्या कशाचाच विचार केला नाही. प्रवेशद्वारावर असलेल्या गार्डला कुणासोबत चाललो, ते सांगण्याचीही तसदी घेतली नाही. कारण आता आपल्याला

मम्मीने बुलाया है...
आईस्क्रीम, चॉकलेट खिलाता हूं : क्रूरकर्म्याने आमिष दाखवून युगला संपवले
नागपूर : मम्मीने क्लिनिकमध्ये बोलवल्याचे कळल्यामुळे युगने दुसऱ्या कशाचाच विचार केला नाही. प्रवेशद्वारावर असलेल्या गार्डला कुणासोबत चाललो, ते सांगण्याचीही तसदी घेतली नाही. कारण आता आपल्याला मम्मीसोबत गप्पा करायला मिळणार, छानपैकी काही तरी खायला मिळणार, या कल्पनेनेच तो हुरळला होता. ज्याच्यासोबत चाललो तो क्रूरकर्मा मम्मीच्या क्लिनिकमध्ये नव्हे तर थेट काळाच्याच जबड्यात नेणार त्याला ही कल्पनाच नव्हती. अन् एवढी भयावह कल्पना करण्याचे त्याचे वयही नव्हते. त्याचमुळे त्याचा घात झाला. मम्मीने बोलवल्याची थाप मारून राजेशने चिमुकल्या युगला त्याच्या आईपासून कायमचे हिरावून नेले.
पोलिसांच्या कस्टडीत असलेल्या क्रूरकर्मा राजेश धन्नालाल दवारे (रा. वांझरी, कळमना) आणि अरविंद अभिलाष सिंग (रा. नारा रोड, जरीपटका) हे दोघेही थंड डोक्याचे गुन्हेगार आहेत. अपहरण आणि खून केल्यानंतर तब्बल २४ तास उजळ माथ्याने फिरणाऱ्या या क्रूरकर्म्यांनी आता कुठे पोलिसांपुढे नांगी टाकली आहे. चौकशीदरम्यान पोलिसांसमोर एक एक धक्कादायक पैलू उघड करीत आहेत.
एक आठवड्यापूर्वी कट रचला
आरोपी राजेशला १२ आॅगस्टला कामावरून काढण्यात आले. त्यामुळे डॉक्टरला धडा शिकवायचा आणि त्यांच्याकडून रोकडही वसूल करायची, असा कट आरोपीने रचला. एक आठवड्यापूर्वी क्रूरकर्मा राजेशने युगच्या अपहरणाच्या कटाचा विचार अरविंदला सांगितला. पाच ते दहा कोटी रुपये मिळतील. जीवनभर ऐश करू, असेही सांगितले. अरविंदने कशाचाही विचार न करता या कटात सहभागी होण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर एखाद्या सिनेमाच्या स्क्रीप्टप्रमाणेच या दोघांनी आपले कटकारस्थान पूर्ण केले.
आपल्याला सर्व जण ओळखतात त्यामुळे राजेशने स्वत: युगला सोबत घेण्याऐवजी अरविंदला लाल रंगाचा टी शर्ट (क्लिनिकमध्ये असताना राजेश वापरायचा) घालायला सांगून दुपारी ३.३० वाजता स्कूटी घेऊन युगच्या घरासमोर उभे केले. (युग कोणता आहे, हे राजेशने अरविंदला आधीच दाखवले होते) युग स्कूलबसमधून उतरताच अरविंदने त्याला हात पकडून जवळ ओढले. ‘मम्मीने क्लिनिक मे बुलाया है... चल जल्दी. रास्ते मे चॉकलेट और आईस्क्रीमभी खायेंगे’ असे म्हणत त्याने युगला सोबत घेतले. मम्मीसोबत राहायला मिळणार, त्यात चॉकलेट, आईस्क्रीमही मिळणार, हे ऐकून युग हुरळलाच. आपल्या क्लिनिकचा टी शर्ट घालून असल्यामुळे तो (अरविंद) कर्मचारीच असावा, असे मानत युग त्याच्यासोबत चलण्यास तयार झाला. दप्तर ठेवून येण्यापूर्वी ‘गार्ड को कुछ बताना नही’, ही सूचना केली. निरागस युगने मम्मीच्या नावाखाली ती सूचनाही तंतोतंत पाळली.(प्रतिनिधी)
युगच्या लक्षात आले होते, पण...
आईस्क्रीम, चॉकलेट देण्याचे आमिष दाखवणाऱ्या अरविंदने दुचाकी लकडगंज बगिचा चौकाकडे नेली. तेथे राजेश दिसला. त्यानेही चॉकलेटचे आमिष दाखवले. मात्र, हे दोघे विनाकारण इकडे तिकडे फिरवत आहेत, आपल्या क्लिनिकच्या रस्त्याने न नेता भलतीकडेच घेऊन चालले आहे, ते दगाफटका करू शकतात, हे चिमुकल्या युगच्या लक्षात आले. त्यामुळे तो ‘जल्दी मम्मी की तरफ चलो’ म्हणून प्रतिकाराच्या पवित्र्यात आला. त्याने आरडाओरड केली तर, आपले कटकारस्थान उधळू शकतो, याची जाणीव राजेश आणि अरविंदला झाली. त्यामुळेच त्यांनी क्लोरोफॉर्मचा रुमाल युगच्या नाकातोंडावर घट्ट केला अन् बेशुद्धावस्थेतच त्याचा गळाही दाबला. आईकडे नेतो असे सांगून या क्रूरकर्म्यांनी एका निरागस जीवाला काळाच्या जबड्यात ढकलले.