मुलासाठी आई मागते भीक

By Admin | Updated: April 4, 2017 01:48 IST2017-04-04T01:48:53+5:302017-04-04T01:48:53+5:30

पोटासाठी भाकर शोधण्यासाठी शहरात येत असतानाच सुनीलचा अपघात झाला आणि मांडीपासून पाय गमवून बसला.

The mother asked for a boy | मुलासाठी आई मागते भीक

मुलासाठी आई मागते भीक

उपचाराचा खर्च डोईवर मेयोने हाकलले तर मेडिकलने दिली तारीख गरिबाने जायचे कुठे ?
नागपूर : पोटासाठी भाकर शोधण्यासाठी शहरात येत असतानाच सुनीलचा अपघात झाला आणि मांडीपासून पाय गमवून बसला. मेयो सरकारी रुग्णालय असलेतरी उपचारात हातचे होते नव्हते ते सर्व खर्च झाले. कापलेल्या पायाची जखम भरण्यासाठी मेयोने मेडिकलच्या प्लास्टिक सर्जरी विभागात पाठविले, परंतु येथे उपचार नव्हे मिळाली ती तारीख. पुन्हा तो मेयोत आला. मात्र येथील डॉक्टरांनी हाकलून लावले. तीन दिवसांपासून सुनील, त्याची पत्नी आणि आई उघड्यावर दिवस काढत आहे. जखमेवर बँडेज बांधण्यासाठीही या कुटुंबाकडे पैसे नसल्याने सुनीलची आई भिक मागून उपचार करीत आहे.
काटोलच्या समोर असलेल्या भोरगड गावात सुनील भीमराव सय्याम राहतो. गावात हाताला काम नाही. जगण्याचे साधन नाही. यामुळे शहरात येऊन मजुरी करून पोटाची भूक भागवू या विचाराने तो त्याची आई निर्मलाबाई व पत्नी सोनूसोबत रेल्वेतून नागपूरकडे निघाला. ३ मार्च रोजी मोतीबाग रेल्वेस्टेशनवर आला असताना कुणीतरी मागून धक्का दिला. सुनील रेल्वेतून खाली पडला. यात त्याचा डाव पायच गुडघ्यापासून कापला गेला.
रेल्वे पोलिसांनी त्याला मेयोत दाखल केले. गँगरीन होऊ नये म्हणून मांडीपर्यंत पाय कापला. तीन आठवड्यानंतर मेयोने जखमेवर त्वचा लावण्यासाठी मेडिकलच्या प्लॅस्टिक सर्जरीच्या विभागात जाण्यास सांगितले.
परंतु या विभागाने दोन दिवसानंतर येण्यास सांगितले. कुठे जावे, म्हणून सय्याम कुटुंबाने उघड्यावर दिवस काढले. दोन दिवसानंतर पुन्हा या विभागात गेल्यावर त्यांना १५ दिवसांची तारखी दिली. जखम ओली असल्याने त्यावरील उपचारासाठी पुन्हा ते मेयोत आले, तर येथील एका डॉक्टरने वारंवार येथे येऊ नका म्हणून हाकलून लावले. महिन्याभराच्या उपचारात या कुटुंबाचे पैसे संपले. जखमेवर बँडेज बांधण्यासाठीही या कुटुंबाकडे पैसे नव्हते. शेवटी सुनीलच्या आईने हिंमत करून मोमीनपुऱ्यात जाऊन भिक मागितली. त्यात मिळालेल्या पैशातून बँडेज आणि खायला विकत आणले. गेल्या चार दिवसांपासून हे कुटुंब असेच जगत आहे. परंतु कुणाचेच लक्ष नाही.
त्यांना बोलते केल्यावर सुनीलची आई निर्मलाबाई रडत म्हणाल्या, उद्या भिकमध्ये चारशे-पाचशे रुपये मिळाले की गावाला जाईन, पण येथे नाही राहीन, असे म्हणून त्यांनी पुढील बोलणे टाळले. (प्रतिनिधी)

कुणी आहे का दाता ?
मेयो, मेडिकल उपचार करीत नाही, आणि गावाकडे जायला पैसे नाहीत. यामुळे गेल्या चार दिवसांपासून मेयोच्या परिसरात सय्याम कुटुंब उघड्यावर पडले आहे. भीक मागून कसेतरी पोटाची खळगी भरत आहे. यातच आठवड्यातून दोन वेळा सुनीलच्या पायावर मलमपट्टी करण्यास डॉक्टरांनी सांगितले आहे. याचा एकावेळचा खर्च हा १०० रुपयांच्या घरात आहे. कर्ता व्यक्तीच अंपग झाल्याने हे कुटुंब संकटात सापडले आहे. या कुटुंबाला समाजाच्या मदतीची गरज आहे. हीच मदत या कुटुंबाला पुन्हा एकदा जगण्याची उभारी व लढण्याचे बळ देऊ शकते.

Web Title: The mother asked for a boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.