ओसीडब्ल्यूमुळे सर्वाधिक खड्डे
By Admin | Updated: July 2, 2015 03:04 IST2015-07-02T03:04:11+5:302015-07-02T03:04:11+5:30
पहिल्याच पावसाने शहरातील रस्त्यावर खड्डे पडल्याने महापालिकेची पोल खोलली होती.

ओसीडब्ल्यूमुळे सर्वाधिक खड्डे
नागपूर : पहिल्याच पावसाने शहरातील रस्त्यावर खड्डे पडल्याने महापालिकेची पोल खोलली होती. नागरिकात असंतोष आहे. याची दखल घेत स्थायी समितीने शहरातील खड्ड्यांचा शोध घेऊ न याला जबाबदार असणाऱ्यांना खड्डे बुजवण्याचे निर्देेश दिले होते. याचा झोननिहाय सर्वे केला असता ओसीडब्ल्यू व रिलायन्सचे सर्वाधिक खड्डे असल्याची माहिती पुढे आली आहे.
ओसीडब्ल्यूने शहरात पाण्याची पाईप लाईन टाकण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी खोदकाम केल्यानंतर अनेक भागातील खड्डे बुजवण्यात आलेले नाही. अशा खड्ड्यांची संख्या १८९ आहे. तसेच ५२ चर खोदण्यात आले आहे. रिलायन्स कंपनीने ४ जी नेटवर्कसाठी केबल टाकण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी ८१ ठिकाणी खड्डे तर २८ चर खोदले आहेत.
शहरातील खड्ड्यांची २९ जूनपर्यत यादी तयार करण्याचे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी दिले होते. बुधवारी त्यांनी याचा आढावा घेतला. झोन अधिकाऱ्यांकडून त्यांनी माहिती घेतली. यावेळी ही माहिती देण्यात आली.
एअरटेल,आयडीया व वोडाफोन कंपन्यांनी हनुमाननगर झोनमध्ये प्रत्येकी एक, स्पॅन्को, महावितरण यांनी हनुमाननगर येथे प्रत्येकी दोन, लक्ष्मीनगर झोनमध्ये खोदकाम केले आहे. ६ जुलैला खड्ड्यांचा फेरआढावा बैठक बोलवण्यात आली आहे. १५ दिवसात शहरातील सर्व खड्डे बुजवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. खड्डे न बुजवणाऱ्या कंपन्यावर कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती सिंगारे यांनी दिली. (प्रतिनिधी)