नागपूर विमानतळावर देशातील सर्वाधिक महागडे पार्किंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:07 IST2021-05-28T04:07:03+5:302021-05-28T04:07:03+5:30
नागपूर : पार्किंगसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे (एएआय) नियम देशातील सर्वच विमानतळांसाठी बंधनकारक आहेत. त्यानंतरही डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ...

नागपूर विमानतळावर देशातील सर्वाधिक महागडे पार्किंग
नागपूर : पार्किंगसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे (एएआय) नियम देशातील सर्वच विमानतळांसाठी बंधनकारक आहेत. त्यानंतरही डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर वाहनचालकांकडून देशातील अन्य विमानतळांपेक्षा दुप्पट, तिप्पट शुल्क वसूल करण्यात येत असल्याची बाब माहितीच्या अधिकाराद्वारे मागितलेल्या माहितीमधून उघड झाली आहे.
नागपूर विमानतळाचे व्यवस्थापन एएआयच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करीत आहे. पार्किंग शुल्कावर नियंत्रण आणण्याची मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
पार्किंग शुल्काची लूट थांबवा
आरटीआय कार्यकर्ते संजय थूल यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर, पुणे, पोर्ट ब्लेअर, कोलकाता, चेन्नई या विमानतळांवरील पार्किंग शुल्काचे दर मागितले आहेत. त्यानुसार नागपूर विमानतळावर मनमानी शुल्क वसूल करण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. नागपूर विमानतळाचे संचालन राज्य शासनाच्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) मिहान इंडिया लिमिटेड (एमआयएल) कंपनीतर्फे करण्यात येते. कंपनीने पाच वर्षांसाठी पार्किंगच्या निविदा काढून कंत्राटी पद्धतीवर दिले आहे. मार्च २०२१ पर्यंत विमानतळाने ११.२१ कोटी रुपये गोळा केले आहेत. नागपूर विमानतळ सी वर्गवारीत येत असतानाही, वसूल करण्यात येणारे पार्किंगचे दुप्पट शुल्क वाहनचालकांवर अन्याय करणारे आहे. या शुल्काच्या माध्यमातून होणारी लूट थांबवावी, असे संजय थूल यांनी म्हटले आहे.
वाहनचालकांची फसवणूक
पार्किंगच्या नव्याने निविदा काढा
थूल म्हणाले, पोर्ट ब्लेअर विमानतळावर ३० मिनिटांसाठी कोच (बस/ट्रक) ३० रुपये, टेम्पो, एसयूव्ही, मिनी बस, कारकरिता ३० रुपये, दुचाकीसाठी १० रुपये, तसेच ३० पेक्षा जास्त मिनिटांसाठी कोच (बस/ट्रक) ७० रुपये, टेम्पो, एसयूव्ही, मिनी बसकरिता ६० रुपये, कारला ५५ आणि दुचाकीसाठी १५ रुपये पार्किंग शुल्क आकारण्यात येते. तसेच चेन्नई, कोलकाता, पुणे आणि वडोदरा विमानतळावर ३० मिनिटांसाठी कोच, बस, ट्रककरिता ५० रुपये, अन्य वाहनांसाठी ४० रुपये, दुचाकीला २० रुपये व ३० पेक्षा जास्त मिनिटांसाठी दुचाकीला २५ रुपये, तर अन्य सर्व वाहनचालकांकडून दुप्पट शुल्क घेण्यात येते. पण नागपूर विमानतळ सी श्रेणीत येत असल्याने एएआयच्या नियमानुसार ३० मिनिटांसाठी कोच, बस, ट्रककरिता ३० रुपये, कार २० रुपये आणि दुचाकीकरिता १० रुपये पार्किंग शुल्क अपेक्षित आहे. पण मिहान इंडिया लिमिटेड कंपनी मनमानी करीत असून हवे तेवढे शुल्क आकारून वाहनचालकांची फसवणूक करीत आहे. याशिवाय टर्मिनल इमारतीत पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ कार उभी राहिल्यास १२० रुपये शुल्क वसूल करते. या अवैध वसुलीमुळे नागपूर विमानतळाच्या पार्किंग निविदा रद्द करून भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या नियमानुसार निविदा काढव्यात, अशी मागणी संजय थूल यांनी केली.