सर्रास फिरताहेत फरार गुन्हेगार

By Admin | Updated: May 7, 2015 02:17 IST2015-05-07T02:17:06+5:302015-05-07T02:17:06+5:30

खून आणि इतर दुसऱ्या गंभीर आरोपात पोलिसांना हवे असलेले कुख्यात फरार असलेले आरोपी शहरात राजरोसपणे फिरत आहेत. असे ४१७ गुन्हेगार पोलिसांच्या दस्तऐवजानुसार अनेक वर्षांपासून फरार आहेत.

Most criminals absconding criminals | सर्रास फिरताहेत फरार गुन्हेगार

सर्रास फिरताहेत फरार गुन्हेगार

जगदीश जोशी  नागपूर
खून आणि इतर दुसऱ्या गंभीर आरोपात पोलिसांना हवे असलेले कुख्यात फरार असलेले आरोपी शहरात राजरोसपणे फिरत आहेत. असे ४१७ गुन्हेगार पोलिसांच्या दस्तऐवजानुसार अनेक वर्षांपासून फरार आहेत. त्यांना शोधण्यासाठी पोलिसांकडे वेळ नाही. मंगळवारी गुन्हे शाखा पोलिसांच्या हाती लागलेल्या यादीत चंदा ठाकूर हिच्या प्रकरणावरून शहर पोलिसांचे पितळ उघडे पडले आहे. पोलीस आयुक्त एस.पी. यादव हे शहर पोलिसांत ‘वर्क कल्चर’ आणण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांनी पोलिसांचा रुबाब वाढविण्यासाठी स्वत:च्या कार्यालयातूनच याची सुरुवात केली आहे. परंतु पोलीस ठाण्यातील कामकाजात मात्र अजूनही बदल घडून आलेला नाही.
लोकमतने १ मे रोजी चंदा ठाकूरबाबत वृत्त प्रकाशित केले होते. २९ एप्रिल २०१४ रोजी गणेशपेठ येथील नीलेश हजारेचा खून करण्यात आला होता. यात गणेशपेठ येथील महिला गुन्हेगार प्रेमा दरवाडे, तिचा मुलगा, तिचे तीन मित्र, चंदा ठाकूर आणि तिची मुलगी व जावई सहभागी होते. चंदा, मुलगी आणि जावई पुरावे नष्ट करण्याचे आरोपी होते. प्रेमा, तिचा मुलगा आणि तीन मित्रांना पकडण्यात आले होते. चंदाची मुलगी आणि जावयाने सत्र न्यायालयातून जामीन मिळविला होता. चंदाला जामीन न मिळाल्याने ती फरार झाली होती. नीलेश हत्याकांडाच्या तपास अधिकाऱ्यांनी चंदाला पकडण्यासाठी विशेष तत्परता दाखविली नाही. तिला फरार झाल्याचे दाखवून आरोपपत्रही सादर केले.
पोलिसांची भीती नसल्याने फरार असूनही चंदा इतवारी स्टेशनजवळ आपला अड्डा चालवू लागली. लोकमतच्या वृत्तानंतर चंदा वर्षभरापासून फरार असल्याची माहिती उघडकीस आली. चंदा मादक पदार्थांची तस्कर असल्याने गुन्हे शाखा तिला शोधू लागली. दोन दिवस तिने पोलिसांना चकमा दिला. परंतु बुधवारी ती अड्ड्यावरच पोलिसांच्या हाती लागली. उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतरही पोलिसांनी चंदाच्या अटकेसाठी कुठलीही गंभीरता दाखविली नाही. बुधवारी गुन्हे शाखेने तिला पकडल्यानंतर न्यायालयासमोर सादर करून एक दिवसाची पोलीस कोठडी घेतली. पोलिसांना जे ४१७ फरारी गुन्हेगार हवे आहेत त्यात ५० पेक्षा अधिक गंभीर प्रकरणांमध्ये सहभागी असलेले सराईत गुन्हेगार आहेत. गुन्ह्यामुळेच त्यांचे अस्तित्व टिकून आहे. शहरात राहणे त्यांचा नाईलाज आहे. अशा परिस्थितीत पोलीस त्यांना आपल्या नेटवर्कच्या माध्यमातून सहजपणे शोधू शकतात. परंतु त्यांच्या सक्रियतेमुळे पोलिसांचे खिसे गरम होत असल्याने पोलीस त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे. चंदा ठाकूरचे प्रकरणही तसेच आहे. चंदाच्या अड्ड्यावरून अनेक पोलिसांचे खिसे गरम होतात. मोमीनपुराचा कुख्यात वस्सी खान, नयन चिंतलवार, बबन पाटील, इशाक मस्के, हाजी, लाला राहाटे यासारखे डझनभर गुन्हेगार आहेत. पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये फरार असलेले बहुतांश गुन्हेगार मोमीनपुऱ्यात लपले आहेत. परंतु पोलिसांची मोमीनपुऱ्यातील गल्ल्यांमध्ये फिरण्याची हिंमतच होत नाही.

Web Title: Most criminals absconding criminals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.