मोजोस हुक्का पार्लरवर धाड
By Admin | Updated: November 18, 2015 03:04 IST2015-11-18T03:04:55+5:302015-11-18T03:04:55+5:30
बजाज चौकातील बहुचर्चित मोजोस हुक्का पार्लरवर सोमवारी मध्यरात्री पोलिसांनी धाड टाकून विविध कंपन्याचे मद्य आणि अन्य चिजवस्तू जप्त केल्या.

मोजोस हुक्का पार्लरवर धाड
विना परवाना विक्री : पोलिसांनी सील लावले
नागपूर : बजाज चौकातील बहुचर्चित मोजोस हुक्का पार्लरवर सोमवारी मध्यरात्री पोलिसांनी धाड टाकून विविध कंपन्याचे मद्य आणि अन्य चिजवस्तू जप्त केल्या. परवाना नसताना या हुक्का पार्लरमध्ये आक्षेपार्ह बाबी सुरू असल्याचे लक्षात आल्यामुळे पोलिसांनी या हुक्का पार्लरला सील लावले.
अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणारे मोजोस हुक्का पार्लर गेल्या अनेक दिवसांपासून विविध कारणांमुळे चर्चेत होते. येथे लेटनाईट पार्ट्या आणि अन्य गैरप्रकार चालतात, अशा सारख्या तक्रारी झाल्यामुळे पोलिसांनी तेथे आकस्मिक तपासणीही केली होती. गैरप्रकार आढळल्याने पोलीस उपायुक्त शैलेश बलकवडे यांनी मोजोसचे इटिंग लायसेन्स (खाद्य परवाना) रद्द केले होते.
तरीसुद्धा मोजोसमध्ये खाद्यपदार्थ आणि विविध प्रकारचे मद्य पहाटेपर्यंत बिनधास्त विकले जात असल्याच्या तक्रारी पोलिसांना मिळाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, पोलीस उपायुक्त शैलेश बलकवडे यांनी सहायक आयुक्त अशोक मसराम आणि अन्य सहकाऱ्यांना घेऊन सोमवारी मध्यरात्री १ वाजता मोजोस हुक्का पार्लरवर धाड घातली. तेवढ्या रात्री येथे पोलिसांना पाच ग्राहक आढळले. त्यांचे खाणेपिणे सुरू होते. परवाना नसताना पार्लरचा मालक खाद्य पदार्थ आणि मद्यविक्री करीत असल्याचे आढळल्याने उपायुक्त बलकवडे यांनी मोजोसमधून वेगवेगळ्या ब्रॅण्डचे ३२ हजार २०० रुपये किमतीचे मद्य आणि बीअर जप्त केली.(प्रतिनिधी)
हुक्का पार्लर संचालकांमध्ये खळबळ
हे हुक्का पार्लर तिघांच्या भागीदारीत चालविले जाते. मात्र कागदोपत्री बलजित ऊर्फ बल्ली अरविंद ओसान (वय २८,रा. अमरजीत सोसायटी जरीपटका) आणि अक्षय अजय मेहता (वय २६, रा. बैरामजी टाऊन) या दोघांविरुद्ध दारुबंदी अधिनियमाचे कलम ६५ (क, ड) अन्वये गुन्हा दाखल केला. या कारव\ाईनंतर मोजोसला सील लावण्यात आल्याची माहिती उपायुक्त बलकवडे यांनी दिली. अंबाझरीचे प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश गारोडे, उपनिरीक्षक पी. डी. जाधव, नायक श्रीकांत उके आणि बलजित ठाकूर यांचा या कारवाईत सहभाग होता. उपनिरीक्षक जाधव या प्रकरणी चौकशी करीत आहेत. या कारवाईमुळे हुक्का पार्लरच्या संचालकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.