खाणीच्या जागेवर वाजवीपेक्षा अधिक खाेदकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:43 IST2021-02-05T04:43:44+5:302021-02-05T04:43:44+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क हिंगणा : तालुक्यातील कवडस शिवारातील काही जागा गिट्टीच्या खाणीसाठी लीजवर देण्यात आली आहे. संबंधिताने त्या जागेवर ...

खाणीच्या जागेवर वाजवीपेक्षा अधिक खाेदकाम
लाेकमत न्यूज नेटवर्क
हिंगणा : तालुक्यातील कवडस शिवारातील काही जागा गिट्टीच्या खाणीसाठी लीजवर देण्यात आली आहे. संबंधिताने त्या जागेवर वाजवीपेक्षा अधिक खाेदकाम केल्याची तक्रार प्राप्त हाेताच महसूल व खनिकर्म विभागातील अधिकाऱ्यांनी धाड टाकून पाहणी केली.
महसूल व खनिकर्म विभागाने कवडस शिवारातील काही जमीन गिट्टीच्या खाणीसाठी लीजवर देण्यात आली. ही जमीन निहार जयंत खडतकर व संजय चंद्रशेखर इंगळे यांच्या मालकीची आहे. खाण मालकाने लगतच्या सर्वे क्रमांक- २२५/१ मधील सहा हेक्टर जागेवर अतिक्रमण करण्यात आल्याची तक्रार महसूल व खनिकर्म विभागाकडे करण्यात आली हाेती. त्या अनुषंगाने खनिकर्म विभागाचे जी.एन. पाटील, हिंगणा तहसाील कार्यालयातील नायब तहसीलदार महादेव दराडे, तलाठी रवींद्र गायगाेले यांच्यासह कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (दि. २९) दुपारी धाड टाकून पाहणी केली.
अधिकाऱ्यांना या ठिकाणी १६० ते १८० मीटर लांब व रुंद, तसेच ३० मीटरपर्यंतचे अतिरिक्त खाेदकाम करून दगड काढण्यात येत असल्याचे आढळून आले. तिथे ब्लास्टिंगची मशीनही आढळून आली. हा भाग वन विभागाच्या बफर झाेनमध्ये येत असल्याने, येथे स्फाेट घडवून आणण्याची परवानगी नाही. अधिकाऱ्यांनी संबंधितांना राॅयल्टी व इतर कागदपत्रांची विचारणा केली. मात्र, कुणीही कागदपत्रे सादर केली नाहीत. हे खाेदकाम राेड तयार करणारी केसीसी नामक कंपनी करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे प्रशासन खाण मालकावर नेमकी काय कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.