सर्वाधिक वर्दळीचे क्षेत्र : चेन स्नॅचिंगच्याही घटनांत वाढ आनंद डेकाटे -नागपूरसदर हा शहरातील एक प्रमुख बाजारपेठ व निवासस्थान असलेला भाग म्हणून ओळखला जातो. शहरातील सर्व महत्त्वाची कार्यालये आणि विशिष्ट व अतिविशिष्ट लोकांची निवासस्थाने सदर पोलीस ठाणे हद्दीतच येतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचाच भार येथील पोलिसांवर सर्वाधिक आहे. याशिवाय मोटारचोर व ‘चेन स्नॅचिंग’च्या घटनासुद्धा अलीकडे वाढलेल्या आहेत. सिव्हिल लाईन्स, हायकोर्ट, जिल्हा न्यायालय, पोलीस आयुक्त कार्यालय, राजभवन, रविभवन, महानगरपालिका, विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हा परिषद, विविध शासकीय कार्यालये, व्हीसीए स्टेडियम, कस्तुरचंद पार्क, रिझर्व्ह बँक, पूनम चेंबर्स, पागलखाना आदी महत्त्वाची कार्यालये येतात आणि परिसर या पोलीस ठाणे हद्दीअंतर्गत येतो. सर्वच प्रकारची महत्त्वाची कार्यालये याच भागात असल्याने शहरभरातून इतकेच नव्हे तर पूर्व विदर्भातील लोकांनाही कामासाठी येथे यावेच लागते. त्यामुळे सर्वाधिक वर्दळ येथे असते. राजभवन ते रामगिरीसदर पोलीस ठाणे अंतर्गत अतिविशिष्ट लोकांची निवासस्थाने येतात. यामध्ये राज्यपालांचे शासकीय निवासस्थान राजभवन, मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेले रामगिरी आणि उपमुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेले देवगिरी सदर पोलीस ठाणे हद्दतीच मोडतात. इतकेच नव्हे तर राज्यातील मंत्र्यांची निवासस्थाने असलेले रविभवन हे सुद्धा सदरमध्येच येतात. नागपूर हे उपराजधानीचे ठिकाण असल्याने दरदिवशी एखादा व्हीआयपी किंवा नेते मंडळी नागपुरात येत जात असतात. ते बहुतांश सिव्हिल लाईन्स परिसरातच वास्तव्यास असतात किंवा त्यांची बैठक असते. अशा वेळी सुरक्षेची जबाबदारी ही सदर पोलिसांचीच राहते. त्यामुळे त्यांचा सर्वाधिक वेळ हा सुरक्षेसाठीच जात असतो. यासोबतच जवळपास सर्वच न्यायाधीशांची निवासस्थाने, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, तहसीलदार यांची निवासस्थाने, राजनगर, विजयनगरातील उच्चभ्रूंची वस्ती आणि बैैरामजी टाऊनसारखा उद्योगपतींचा परिसरही सदर पोलिसांच्या हद्दीत येतो. त्यामुळे या परिसरात एखादी छोटीशी घटना घडली तरी पोलिसांना थेट जाब विचारला जातो. कधी कोणत्या अधिकाऱ्याचा किंवा पुढाऱ्याचा फोन येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे सदर पोलीस नेहमीच तणावात असतात. व्हीसीए स्टेडियम ते कस्तुरचंद पार्क व्हीसीए स्टेडियम हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे मैदान आहे. काही वर्षांपूर्वी जामठ्याला नवीन स्टेडियम तयार झाल्याने जवळपासच सर्वच आंतरराष्ट्रीय सामने जामठ्यालाच होत असल्याने सुरक्षेचा भार थोडा कमी झाला असला तरी सिव्हिल लाईन्स येथील व्हीसीए स्टेडियममध्ये आता क्रिकेट अकादमी उघडण्यात आली आहे. तसेच रणजी व इतर राष्ट्रीय सामने येथेच खेळविले जातात. त्यामुळे लक्ष ठेवून राहावे लागते. कस्तुरचंद पार्क हे शहरातील प्रमुख मैदान आहे. मोठ्या राजकीय सभा याच मैदानावर होत असतात. तसेच मोठमोठे प्रदर्शनंसुद्धा याच मैदानावर भरविली जातात. त्याचा सुद्धा भार पोलिसांवर असतोच. पेट्रोलिंगवर अधिक भर सदर पोलीस ठाणे अंतर्गत वाहनचोरी आणि चेनस्नॅचर्सच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. चेनस्नॅचिंग करणारे चोर हे मोटरसायकलवर ज्या गतीने येतात आणि सोनसाखळी पळवून नेतात ते पाहता सदर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी.के. राठोड यांनी पेट्रोलिंगवर अधिक भर दिला आहे. तसेच नाकेबंदी करून जास्त वेगाने धावणाऱ्या मोटार सायकलस्वारांची चौकशी केली जात आहे. चार चौरस किलोमीटरचा परिसर सदर पोलीस ठाण्याचा संपूर्ण परिसर चार चौरस किलोमीटर अंतर्गत येतो. हे क्षेत्र फारसे मोठे नसले तरी सिव्हिल लाईन्ससारखी महत्त्वाची वसाहत या भागातच मोडत असल्याने नेहमीच दक्ष राहावे लागते. हायकोर्टपासून तर बैरामजी टाऊनपर्यंत आणि राजनगरपासून तर कस्तुरचंद पार्कपर्यंत पोलीस ठाण्याची हद्द आहे. महापालिका आणि एमईसीबी आॅफिस महानगरपालिका आणि गड्डीगोदाम येथील एमईसीबी आॅफिस याच पोलीस ठाणे हद्दीत येतात. महानगरपालिकांवर नेहमीच सामाजिक संघटना व राजकीय पक्षांची आंदोलने होत असतात. दररोज एखाद दुसरे आंदोलन असतेच. हीच परिस्थिती एमएसईबी कार्यालयाची आहे. विजेचे संकट ओढवल्यास नागरिकांचा थेट मोर्चा गड्डीगोदाम येथील वीज कार्यालयावर असतो. या पार्श्वभूमीवर पोलिसांना लक्ष ठेवून राहावे लागते. दुचाकी चोर व चेनस्नॅचर्सचा हैदोस खून, दरोडे, मारामारीसारखे गुन्हे या परिसरात कमी असले तरी मागील काही वर्षांमध्ये दुचाकी चोर आणि चेनस्नॅचर्सने चांगलाचा हैदोस घातला आहे. बहुतांश उच्चभ्रू लोकांची ही वस्ती असून फारशी वर्दळ राहात नसल्याने चेनस्नॅचर्स येथे वाढले आहेत. हायकोर्ट रोडवर बालोद्यान ते जपानी गार्डन आणि मुख्यमंत्री निवासस्थानसमोरचा रोड तसेच काटोल रोडवरील राजनगर, बैरामजी टाऊन परिसरात मोठ्या प्रमाणावर मॉर्निंग वॉक करणारे फिरतात. तेव्हा फारशी वर्दळही नसते. त्यामुळे चेनस्नॅचर्संनी या परिसरावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. चेनस्नॅचर्सच्या धाकामुळे पोलिसांनी रामगिरीसमोरच्या रस्त्यावरून पहाटे आणि सायंकाळच्या सुमारास वाहतुकीवर बंदी घातली होती. मनुष्यबळाची गरज सदर पोलीस ठाण्यामध्ये ९ अधिकारी आणि १५० कर्मचारी आहेत. मंजूर पदे जवळपास भरलेली आहेत. परंतु वस्तुस्थिती पाहता ही संख्यासुद्धा कमी आहे. कमी मनुष्यबळात जास्त कामे करावी लागत असल्याने पोलिसांवरील ताण वाढला आहे. पोलीस ठाण्यावरील विशिष्ट, अतिविशिष्ट लोकांच्या सुरक्षेवरील भार लक्षात घेता, पोलिसांची संख्या वाढविण्याची गरज आहे. किमान ५० पोलिसांची आणखी आवश्यकता आहे.
व्हीआयपींच्या सुरक्षेचाच अधिक भार
By admin | Updated: July 13, 2014 00:56 IST