मुलभूत सुविधांपेक्षा असुविधांचीच भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:07 IST2021-02-14T04:07:56+5:302021-02-14T04:07:56+5:30

नागपूर : न्यू नरसाळा भागातील नागरिक आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. मागील अनेक वर्षांपासून ते मूलभूत सुविधांसाठी धडपडत आहेत. ...

More inconvenience than basic amenities | मुलभूत सुविधांपेक्षा असुविधांचीच भर

मुलभूत सुविधांपेक्षा असुविधांचीच भर

नागपूर : न्यू नरसाळा भागातील नागरिक आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. मागील अनेक वर्षांपासून ते मूलभूत सुविधांसाठी धडपडत आहेत. एकीकडे शहराचा झपाट्याने विस्तार होऊन नागरिकांना मेट्रो रेल्वेसारख्या सुविधा मिळत असताना न्यू नरसाळा भागातील नागरिकांना मात्र गडरलाईन, रस्ते, गार्डनसारख्या सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. या भागातील निलकमल सोसायटी, चिमोटे ले-आउटमधील भारतमातानगर येथील नागरिकांनी आपल्या व्यथा ‘लोकमत’कडे मांडल्या.

गार्डनचा विकास नाही

न्यू नरसाळा भागातील नीलकमल सोसायटीत गडरलाईन नसल्यामुळे नागरिकांना मनस्ताप होत आहे. या भागात सांडपाणी विहिरीत शिरत असल्यामुळे परिसरातील विहिरी दूषित होण्याचे प्रमाण वाढले आहेत. मागील आठ वर्षांपासून गडरलाईनची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिक करीत आहेत. या भागात रस्त्यांची बिकट अवस्था झाली आहे. रस्त्याचे काम अर्धवट केल्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. परिसरात गार्डनचा विकास झालेला नाही. गार्डनमध्ये खेळणी नसल्यामुळे लहान मुलांची गैरसोय होत आहे.

रिकाम्या प्लॉटमुळे नागरिक त्रस्त

नीलकमल सोसायटीत अनेक नागरिकांनी प्लॉट घेऊन ठेवले आहेत. पावसाळ्यात या रिकाम्या प्लॉटमध्ये पाणी साचते. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव होऊन नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. रिकाम्या प्लॉटमध्ये पाणी साचल्यामुळे साप निघतात. त्यामुळे रिकाम्या प्लॉटधारकांवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे. या भागातील कूपनलिकाही बंद असून, त्या दुरुस्त करण्यासाठी कारवाई करण्यात येत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. रस्ता तयार केल्यानंतर अनेक नागरिक पाईपलाईनसाठी रस्ता खोदतात. त्यामुळे अशा नागरिकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

भारतमातानगरात रस्त्यांची लागली वाट

न्यू नरसाळा परिसरातील चिमोटे ले-आउटमधील भारतमातानगरात नागरिक समस्यांमुळे त्रस्त झाले आहेत. या भागात गडरलाईन नसल्यामुळे घाण पाणी विहिरीत शिरत आहे. त्यामुळे या भागातील विहिरी दूषित होत आहेत. मागील अनेक वर्षांपासून गडरलाईनची व्यवस्था करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. न्यू नरसाळा या मुख्य रस्त्याचे काम अर्धवट केल्यामुळे वाहनचालकांना रस्त्यावरून वाहन चालविण्याची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या भागात युवकांसाठी क्रीडा मैदान आहे. परंतु या मैदानाचा विकास झाला नाही. गार्डनचे कामही अर्धवट करण्यात आले आहे. येथील स्मशानघाटाचे कामही कासवगतीने सुरू असल्यामुळे नागरिकांना तीन किलोमीटर लांब मानेवाडा घाटावर जावे लागते. याशिवाय नरसाळ्याच्या नाल्यावर सुरक्षा भिंत उभारण्याची नागरिकांची मागणी आहे. तसेच महापालिकेने या भागात आपली बसच्या फेऱ्यात वाढ करण्याची मागणी नागरिकांनी केली.

गडरलाईनची व्यवस्था करावी

नीलकमल सोसायटी परिसरात गडरलाईन नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. घाण पाणी विहिरीत शिरत असल्यामुळे परिसरातील विहिरी दूषित होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच या भागातील बंद असलेल्या कूपनलिका सुरू करण्याची गरज आहे.

-उषा पवार, महिला

रस्त्याचे काम पूर्ण करावे

नीलकमल सोसायटीत रस्त्याचे काम अर्धवट सोडल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. या भागातील अंतर्गत रस्ते खराब झाल्यामुळे रस्त्यांची डागडुजी करण्याची गरज आहे. तसेच पावसाळ्यात रिकाम्या प्लॉटमध्ये पाणी साचून डासांचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे रिकाम्या प्लॉटधारकांवर कारवाई करण्याची गरज आहे.

-श्रीकांत गोजे, नागरिक

नाल्यावर सुरक्षा भिंत उभारावी

न्यू नरसाळा भागातील नाल्यावर सुरक्षा भिंत नाही. पावसाळ्यात नाल्याला पूर आल्यानंतर घाण पाणी वस्तीत शिरते. यामुळे दुर्गंधी पसरून नागरिकांना त्रास होतो. या नाल्यावर सुरक्षा भिंत उभारण्याची गरज आहे.

-दिवाकर जंगले, नागरिक

आपली बसच्या फेऱ्या वाढवाव्यात

न्यू नरसाळा परिसरातील अनेक नागरिकांना कामानिमित्त शहरात जावे लागते. परंतु या भागात आपली बसच्या मोजक्या फेऱ्या आहेत. नागरिकांना खासगी वाहनांनी शहरात जाणे परवडत नाही. त्यामुळे या भागात महापालिकेने आपली बसच्या फेऱ्यात वाढ करण्याची गरज आहे.

-योगिता गडपायले, महिला

...........

Web Title: More inconvenience than basic amenities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.