शंभरहून अधिक खांब, ट्रान्सफॉर्मर्सला नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:08 IST2021-05-12T04:08:03+5:302021-05-12T04:08:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सोमवारी रात्री वेगवान वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वीज वितरण प्रणालीचे मोठे नुकसान झाले होते. शंभरहून ...

शंभरहून अधिक खांब, ट्रान्सफॉर्मर्सला नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सोमवारी रात्री वेगवान वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वीज वितरण प्रणालीचे मोठे नुकसान झाले होते. शंभरहून अधिक खांब तसेच ट्रान्सफॉर्मर्स खराब झाले होते. बुटीबोरीच्या महावितरणच्या पथकने तत्परता दाखविल्याने वीज पुरवठा सुरू होऊ शकला.
वादळामुळे टाकळघाट व बुटीबोरी शाखा कार्यालयांतर्गत १२ लघुदाब व ७ उच्चदाबाचे खांब वाकले आहेत. तर रामटेकजवळील आरोली, नगरधन, मनसर, चाचेर, तारसा, धानला, बोरगाव, रेवराल येथे ८० लघुदाब व २५ उच्चदाब खांबांसोबत ५ ट्रान्सफॉर्मर्स खराब झाले. त्यांना ठीक करण्याचे काम सुरू आहे.
बुटीबोरीत हवामानामुळे झालेल्या नुकसानाची माहिती मिळताच कार्यकारी अभियंता प्रफुल्ल लांडे घटनास्थळी पोहोचले. ऑक्सिजन प्रकल्पाला वीज पुरवठा करणारी वाहिनीदेखील तुटली होती. कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या शालिनीताई मेघे रुग्णालयाच्या दोन वाहिन्यादेखील झाड पडल्याने बंद होत्या. प्रकल्पात वीज नसल्याने ऑक्सिजन उत्पादन प्रभावित झाले होते व जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली. तातडीने युद्धपातळीवर डागडुजीचे काम सुरू झाले. १० वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश आले.