शुभांगीच्या उपचारासाठी आणखी मदतीची गरज
By Admin | Updated: December 25, 2016 03:03 IST2016-12-25T03:03:44+5:302016-12-25T03:03:44+5:30
शुभांगी शेषराव देशभ्रतार या तरुणीने मॅस्थेनीया ग्रॅव्हीस या दुर्धर आजारावर मात केली आहे.

शुभांगीच्या उपचारासाठी आणखी मदतीची गरज
‘थायमोमा’ आजाराशी सुरू झुंज : दानदात्यांनी पुढे यावे
नागपूर : शुभांगी शेषराव देशभ्रतार या तरुणीने मॅस्थेनीया ग्रॅव्हीस या दुर्धर आजारावर मात केली आहे. शासकीय मेडिकलमधील डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न आणि शहरातील दानदात्यांनी केलेली आर्थिक मदत तिच्या उपचारात मोलाची ठरली. मात्र ‘थायमोमा’ या आजाराशी सुरू असलेली तिची झुंज अद्याप संपलेली नाही. आॅपरेशन केल्यानंतरच ती पूर्णपणे बरी होऊ शकेल. मात्र यात तिच्या उपचारासाठी आणखी मदतीची गरज आहे. तेव्हा संवेदनशील समाजाने तिच्या उपचारासाठी आणखी मदत करावी असे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे.
शुभांगीला एकाच वेळी मॅस्थेनीया ग्रॅव्हीस आणि थायमोमा या दोन दुर्धर आजारांनी ग्रासले होते. त्यावेळी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात तिच्यावर उपचार झाले. मॅस्थेनीया ग्रॅव्हीस या आजारासाठी आवश्यक असलेले इंजेक्शन अमेरिकेहून मागवावे लागत होते. मात्र आर्थिक परिस्थिती या महागड्या उपचारासाठी परवडणारी नसल्याने शुभांगीचे कुटुंब हतबल झाले होते. अशावेळी लोकमतने तिच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन केले आणि या हाकेला साद देत शहरातील संवेदनशील नागरिकांनी अनेक प्रकारे तिच्या कुटुंबीयांची मदत केली. या मदतीमुळे आवश्यक इंजेक्शन आणता आले व या मॅस्थेनीया आजारावर यशस्वी उपचारही झाले.
एका आजारावर तिने मात केली असली तरी थायमोमा या आजाराचा धोका अद्याप कायम आहे. शुभांगी सध्या घरी असून तिच्यावर झेनीथ हॉस्पीटलच्या डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. हा आजार बरा होण्यासाठी आॅपरेशनशिवाय पर्याय नसून डॉक्टरांनी लेप्रोस्कोपी आॅपरेशन करण्याची सूचना करीत यासाठी किमान ७० हजार रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले. औषधी आणि इतर खर्च मिळून एक लाख रुपये लागतील असा अंदाज आहे. आर्थिक संकटामुळे कुटुंबासमोर तिच्या उपचाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे आॅपरेशन झाले नाही तर पुन्हा मॅस्थेनीयाचाही धोका संभवणार असल्याची भीती डॉक्टरांनी वर्तविली आहे. डॉक्टरांनी १५ दिवसापूर्वी यासाठी सुचविले होते. आधीच उशीर झाला असल्याने त्वरित मदत मिळाल्यास तिच्यावर उपचार सुरू होऊ शकतील. तेव्हापासून पैशांसाठी कुटुंबीयांची वणवण सुरू आहे.
दरम्यान मुख्यमंत्री सहायता निधीतून ४० हजार रुपये मंजूर झाले आहेत. ही रक्कम लवकर मिळाल्यास आॅपरेशनची तयारी सुरू होईल अशी अपेक्षा आहे. त्यानंतर केवळ ६० हजार रुपयांची गरज पडेल. तेव्हा समाजातील संवेदनशील नागरिकांनीही थोडीशी मदत करून शुभांगीला या जीवघेण्या आजारातून बाहेर काढण्यास मदत करावी असे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे. शुभांगीच्या उपचारात मदत करण्यासाठी ७०३८४०८१९६ या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा किंवा बँक आॅफ इंडिया ठाणेगाव शाखेच्या ९७१४१०११००००५५३ या खात्यावर मदत राशी जमा करावी.(प्रतिनिधी)