१७ महिन्यात राज्यभरात २० हजारांहून अधिक अर्भक मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 11:20 AM2020-08-14T11:20:21+5:302020-08-14T11:21:24+5:30

२०१९ पासून १७ महिन्यात राज्यभरात २० हजारांहून अधिक अर्भकमृत्यू झाले आहेत. तर उपजत मृत्यूचे प्रमाणदेखील चिंताजनक आहे.

More than 20,000 infant deaths across the state in 17 months | १७ महिन्यात राज्यभरात २० हजारांहून अधिक अर्भक मृत्यू

१७ महिन्यात राज्यभरात २० हजारांहून अधिक अर्भक मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देमुला-मुलींच्या जन्मसंख्येत सातत्याने घट उपजत मृत्यूचे प्रमाणदेखील चिंताजनकच

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २०१९ पासून १७ महिन्यात राज्यभरात २० हजारांहून अधिक अर्भकमृत्यू झाले आहेत. तर उपजत मृत्यूचे प्रमाणदेखील चिंताजनक आहे. राज्यातील अर्भक मृत्यू थांबण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रकारचे प्रयत्न सुरू असल्याचे दावे करण्यात येतात. मात्र माहिती अधिकारातून समोर आलेली आकडेवारी ही डोळ्यात अंजन टाकणारी आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाकडे विचारणा केली होती. १ जानेवारी २०१९ ते ३१ मे २०२० या कालावधीत राज्यात किती अर्भक, बालमृत्यू झाले, तसेच बालमृत्यूचा दर किती होता, राज्यात किती मुले व मुलींचा जन्म झाला इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. यावर राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ जानेवारी २०१९ ते ३१ मे २०२० या १७ महिन्यांच्या कालावधीत राज्यभरात एक वर्षांपर्यंतच्या २० हजार ७७० अर्भकांचा मृत्यू झाला. तर ८ हजार ७७३ उपजत मृत्यूंची नोंद झाली. बाल व माता मृत्यूंची संख्या नागरी नोंदणी पद्धतीनुसार उपलब्ध नसल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, १ जानेवारी २०१५ ते ३१ मे २०२० या कालावधीमध्ये राज्यभरात ९३ लाख ३ हजार ७०० जन्मांची नोंद झाली. यात ४८ लाख ३७ हजार ५९९ मुले तर ४४ लाख ६६ हजार १०१ मुलींचा समावेश होता. मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्माचे प्रमाण हे ९२.३२ टक्के इतके होते.

जन्मसंख्येत पाच वर्षांत घट
संबंधित आकडेवारीनुसार २०१५ सालच्या तुलनेत पाच वर्षांत जन्मसंख्येत सातत्याने घट दिसून आली आहे. २०१५ साली १० लाख १४ हजार २६३ मुले व ९ लाख ७९ हजार ७९९ मुली अशा एकूण १९ लाख ९४ हजार ६२ जन्मांची नोंद झाली. तर २०१९ साली हीच संख्या १४ लाख २३ हजार ४८७ (७,४३,०४८ मुले व ६,८०,४३९ मुली) इतकी होती. पाच वर्षांतच ५ लाख ७० हजार ५७५ ने जन्मसंख्या घटली.

Web Title: More than 20,000 infant deaths across the state in 17 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू