शिक्षणासोबत बौद्धिक गुणवत्तेवर भर देणारी माॅन्टफोर्ट स्कूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:09 IST2021-02-16T04:09:04+5:302021-02-16T04:09:04+5:30
- समाजभान, आत्मभान जागविण्यासाठी ॲक्टिव्हिटीजला दिले जाते प्राधान्य लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुलांचे भवितव्य बालपणी मिळालेल्या संस्कार व ...

शिक्षणासोबत बौद्धिक गुणवत्तेवर भर देणारी माॅन्टफोर्ट स्कूल
- समाजभान, आत्मभान जागविण्यासाठी ॲक्टिव्हिटीजला दिले जाते प्राधान्य
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुलांचे भवितव्य बालपणी मिळालेल्या संस्कार व शिकवणुकीतून ठरते आणि याचे अनेक दाखले देता येतील. त्यामुळे कोणत्याही मनुष्याच्या जीवनात शालेय शिक्षण अतिशय महत्त्वाचे असते. पुस्तकी शिक्षण हे शासन निर्धारित असते. मात्र, त्या पलीकडे जाऊन शिक्षण संस्थांनी मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर देणे गरजेचे आहे. त्याच अनुषंगाने शिक्षणासोबतच क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम आणि मुलांमध्ये नेतृत्वाचा विकास होईल, अशा घडामोडी राबविणे अत्यावश्यक असते. शिक्षणासोबतच मुलांमध्ये समाजभान, आत्मभान जागृत व्हावे आणि बौद्धिक विकास व्हावा, हा हेतू शिक्षण संस्था व शिक्षकांनी साधणे गरजेचे आहे. नेमका हाच हेतू माॅन्टफोर्ट सीनियर सेकंडरी स्कूल, अशोकवन, वर्धा रोड जपते आहे.
‘मानवसेवा हीच ईश्वरी सेवा’ ही भावना विद्यार्थ्यांमध्ये जागृत करण्यासाठी मॉन्टफोर्ट स्कूल कायम अग्रेसर राहिली आहे. केरळमध्ये आलेल्या महापुरातून नागरिकांना वाचविण्यासाठी मॉन्टफोर्टने महत्त्वाचे योगदान दिले आहे. बाबा आमटे यांच्या वृद्ध व रोगीच्या आश्रमात, तर कधी अनाथालयात धनराशी व सामग्रीचे वितरण विद्यार्थ्यांकरवी केले जाते. बंधुभाव वाढविण्यासाठी रक्षाबंधनासारखे उत्सव अनाथालयात साजरे केले जातात.
मॉन्टफोर्ट स्कूलने नेहमीच प्रतिभावंत व परिश्रमी विद्यार्थ्यांना कायम प्रेरित केले आहे. २०१९मध्ये कलश चंद्रकापुरे या विद्यार्थ्याने शाळेतून अव्वल क्रमांक पटकावला होता. तो आज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगळुरू येथे अध्ययन करतो आहे. जान्हवी व्यास ही २०१७ सालची विद्यार्थिनी भारतीय वायुसेनेचे फ्लाईंग ऑफिसरचे प्रशिक्षण घेत आहे, तर वर्तमानात शाळेत शिकत असलेल्या वैभवी व्यास व ऋषिका अवस्थी या विद्यार्थिनींनी ‘युथ पार्लमेंट’मध्ये शाळेचे प्रतिनिधित्व केले आणि मॉन्टफोर्टला ‘सर्वश्रेष्ठ शाळा’ हा किताब प्राप्त केला आणि वैभवी व्यास हिने ‘सर्वश्रेष्ठ वक्ता’ हा पुरस्कार प्राप्त केला.
आभासी जगात वावरतानाही मुलांमध्ये स्पर्धेची उणीव नाही. विद्यार्थ्यांनी शालेय चित्रकला स्पर्धेत उत्साहात सहभाग घेतला. कशिश चौरसिया, गौरी शिंगणे, लावण्या वाघमारे यासारख्या विद्यार्थिनींनी विविध ऑनलाईन स्पर्धेत सहभागी होऊन विजय प्राप्त केला आहे.
सुदृढतेचा मंत्रही विद्यार्थ्यांनी आत्मसात केला आहे. त्याच अनुषंगाने शाळेतर्फे विद्यार्थ्यांना ग्रीन जिम, व्हॉलिबॉल ग्राऊंड, बास्केटबॉल कोर्ट, बॅडमिंटन कोर्ट, टेबल टेनिस आदी क्रीडाप्रकारांची साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शाळेतर्फे दरवर्षी आंतरविद्यालयीन बास्केटबॉल व व्हॉलिबॉल स्पर्धा आयोजित केली जाते. विद्यार्थ्यांनीही राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांत विजय मिळवून शाळेला गौरवान्वित केले आहे.
मॉन्टफोर्टच्या वतीने दरवर्षी विज्ञान प्रदर्शनासोबतच जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र व गणित प्रयोगशाळांचे आयोजन केले जाते. गणित क्लबद्वारे ‘तैनग्राम्स उपक्रम’, ‘लालटेन उपक्रम’ राबविले जातात आणि त्यात विद्यार्थी उत्साहात सहभागी होत असतात.
भावनात्मक विकासाच्या दृष्टीने गुरू-शिष्याचे नाते दृढ करणारा ‘शिक्षकदिन’, पर्यावरणाच्या अनुषंगाने वृक्षारोपण, स्वातंत्र्यदिन, गणराज्यदिन वैशिष्ट्यपूर्ण रीतीने साजरे केले जातात.
मॉन्टफोर्टच्या वतीने सांस्कृतिक उपक्रमांना महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. वार्षिक स्नेहसंमेलन, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप सोहळा अतिशय मौलिक असतात. प्रत्येक दुसऱ्या वर्षी देशाच्या विविध राज्यांतील विविध मॉन्टफोर्ट शाळांमध्ये साहित्यिक व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन केले जाते. या माध्यमातून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर अभिव्यक्ती व कला प्रदर्शनासाठी व्यासपीठ उपलब्ध होत असते. शिवाय, आंतरविद्यालयीन सांस्कृतिक, साहित्यिक कार्यक्रमांचेही आयोजन होत असते. यातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास द्विगुणित होत असतो.
अशा तऱ्हेने मॉन्टफोर्ट स्कूलच्या वतीने विद्यार्थ्यांना भविष्याचा उत्तम नागरिक बनविण्याचे प्रयत्न शालेय जीवनापासून केले जात आहेत.
...........