आॅगस्टमध्ये मान्सून मंदावला

By Admin | Updated: August 15, 2016 01:41 IST2016-08-15T01:41:57+5:302016-08-15T01:41:57+5:30

सामान्यपणे आॅगस्ट महिन्यात जुलैप्रमाणेच जोरदार पाऊस होतो. मात्र यावेळी आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापासूनच मान्सूनची सक्रियता कमी झाली आहे.

Monsoon slowdown in August | आॅगस्टमध्ये मान्सून मंदावला

आॅगस्टमध्ये मान्सून मंदावला

१४ दिवसात फक्त ७५.४ मिमी पाऊस
नागपूर : सामान्यपणे आॅगस्ट महिन्यात जुलैप्रमाणेच जोरदार पाऊस होतो. मात्र यावेळी आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापासूनच मान्सूनची सक्रियता कमी झाली आहे. १ ते १४ आॅगस्ट दरम्यान नागपुरात फक्त ७५.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आॅगस्टमध्ये साधारणत: सरासरी २७६.५ मिमी पाऊस पडतो. मात्र, यावर्षी आॅगस्टचा अर्धा महिना होऊनही पाहिजे तसा पाऊस पडलेला नाही.
रविवारी दिवसभर आकाशात ढगांची गर्दी होती. काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. सायंकाळीही काही भागात हलका पाऊस झाला. मात्र, जोराचा पाऊस कोसळलाच नाही. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवडाभर मान्सूनची चाल अशीच संथ असेल. विदर्भातील काही भागात पाऊस पडू शकतो. मात्र, त्याची तीव्रता फारशी नसेल. विदर्भ व छत्तीसगडमध्ये मान्सूनची सक्रियता कमी झाली आहे. बिहार, उत्तर प्रदेश व आसपासच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे या भागात चांगला पाऊस पडू शकतो. नागपूरच्या आकाशात ढगांची गर्दी आहे. त्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळत आहे. असे असले तरी पाऊस न झाल्याने किमान व कमाल तापमान एक अंशांनी वाढले आहे. कमाल तापमान ३१.२ अंश तर किमान तापमान २४.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. तसे पाहिले तर जुलैमध्येही सुरुवातीला मान्सून शांत होता. मात्र, दुसऱ्या आठवड्यानंतर जोर धरला व पूर्ण अनुशेष भरून निघाला. तसेच काही आॅगस्टच्या शेवटी होईल, अशी अपेक्षा आहे. १९ जून रोजी नागपुरात मान्सून धडकला होता. आजवर ६२९.७ मिमी पाऊस झाला आहे. या काळातील एरव्हीची सरासरी ६०३.४ मिमी आहे. ही आकडेवारी पाहता सरासरीपेक्षा ४ टक्के अधिक पाऊस पडला आहे. संपूर्ण विदर्भात आजवर ७५८.५ मिमी पाऊस झाला आहे. विदर्भात सरासरीपेक्षा २० टक्के अधिक पाऊस झाला आहे. भंडारा जिल्ह्यात मात्र पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. (प्रतिनिधी)

 

Web Title: Monsoon slowdown in August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.