मान्सूनचा काेटा पूर्ण झाला पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:11 IST2021-09-15T04:11:11+5:302021-09-15T04:11:11+5:30

नागपूर : नाही नाही म्हणता म्हणता पावसाने यावर्षीचा काेटा पूर्ण केला. विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात सरासरीप्रमाणे चांगला पाऊस झाला आणि ...

The monsoon season is over but ... | मान्सूनचा काेटा पूर्ण झाला पण...

मान्सूनचा काेटा पूर्ण झाला पण...

नागपूर : नाही नाही म्हणता म्हणता पावसाने यावर्षीचा काेटा पूर्ण केला. विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात सरासरीप्रमाणे चांगला पाऊस झाला आणि ९५ ते १०० टक्के सरासरी गाठली आहे. मात्र समाधानकारक म्हणावे अशी स्थिती नाही. यावर्षी अनियमितता तीव्रतेने जाणवली. या अनियमिततेमुळे शेतीला फटका बसला असून जलसाठे अपूर्णच राहिले आहेत.

यंदा मान्सूनच्या आगमनात अनेक प्रकारची अनियमितता बघायला मिळाली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार यावर्षी मानसून वेळेत दाखल हाेण्याची आणि समाधानकारक राहण्याची शक्यता वर्तविली हाेती. मात्र केरळमध्ये उद्भवलेल्या स्थितीमुळे पाऊस लांबला. पुढेही ताे नियमितपणे पडला नाही. जूनच्या मध्यानंतर थांबलेल्या पावसाने जुलैच्या मध्यापर्यंत माेठा ब्रेक घेतला. त्यानंतर काही दिवस हजेरी लागली पण पुन्हा खंड पडला. संपूर्ण ऑगस्ट महिना काेरडा गेल्यासारखा गेला. ऐन पावसाळ्याच्या दिवसात पाऊस न झाल्याने माेठा बॅकलाॅग वाढला हाेता. आता सप्टेंबर महिन्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून पाच-सहा दिवस चांगली हजेरी लावली आहे व पुन्हा काही दिवस मुक्काम असणार आहे. त्यामुळे राहिलेला बॅकलाॅग भरून निघाला आहे.

नागपूर विभागात आतापर्यंत ९८५.८ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. सरासरीपेक्षा हे प्रमाण १००.६९ टक्के आहे. गेल्या वर्षी या काळात ९४९.५ मिमी पाऊस झाला हाेता. जून ते सप्टेंबर या काळात १०७२.५ मिमी पाऊस हाेताे. म्हणजे सध्या त्या तुलनेत ९१.९२ टक्के पाऊस झाला असून आणखी १५ दिवस शिल्लक आहेत. विभागात चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक ११४७.१ मिमी म्हणजे ११६ टक्के पावसाची नाेंद करण्यात आली आहे. विदर्भात या काळात सरासरी ८६४.१ मिमी पाऊस पडताे. यावर्षी ८६८ मिमी पाऊस नाेंदविला आहे.

Web Title: The monsoon season is over but ...