मनी सर्जिकलने उतरवली मद्यालयाची झिंग

By Admin | Updated: November 14, 2016 02:42 IST2016-11-14T02:42:20+5:302016-11-14T02:42:20+5:30

काळे धन जमविणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या मनी सर्जिकल स्ट्राइकचा उपराजधानीतील

Money Zodiac of Money | मनी सर्जिकलने उतरवली मद्यालयाची झिंग

मनी सर्जिकलने उतरवली मद्यालयाची झिंग

मद्यपींना कार्डसोबत ‘क्रेडिटची’ सुविधा : गर्दी वाढवण्यासाठी ‘लव्ह पेग’ मोफत
नरेश डोंगरे  नागपूर
काळे धन जमविणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या मनी सर्जिकल स्ट्राइकचा उपराजधानीतील वाईन शॉप आणि बीअर बार मालकांना चांगलाच फटका बसला आहे. ५००, १०००च्या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्याने ग्राहकांनी मद्यालयांकडे पाठ फिरवली. त्यामुळे झिंग उतरलेल्या अनेक मद्यालय मालकांनी गर्दी वाढवण्यासाठी मद्यपींना डेबिट कार्डसह क्रेडिटचीही सुविधा दिली आहे. एवढेच नव्हे तर बिल भरताना मोफत ‘लव्ह पेग’ देणे सुरू केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री १००० आणि ५०० रुपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्याची घोषणा केली. या अनपेक्षित घोषणेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. काळे धन साठवणाऱ्यांसह छोटेमोठे दुकानदार, सर्वच व्यापारी प्रतिष्ठान आणि सर्वसामान्यांमध्येही मनी सर्जिकल स्ट्राईकने हाहा:कार निर्माण केला. बँका, एटीएमसमोर लांबच लांब रांगा लागल्या. ५०० अन् १०००ची नोट स्वीकारण्यास चोहोबाजूने नकार मिळत असल्याने औषध, उपचार, प्रवास करणे अवघड झाले आहे. रोजच्या अत्यावश्यक चीजवस्तू मिळवण्यासाठी सामान्य नागरिकांची धावपळ सुरू आहे. बँकेतून मिळालेली दोन हजाराची नोट स्वीकारण्यास व्यापारी तयार असले तरी अनेक व्यापारी सुटी रक्कम नाही असे सांगून नागरिकांना वेठीस धरत आहे. परिणामी रोजचे जेवण तयार करणेही कठीण झाले आहे.
थकून भागून मद्यालयाकडे वळणाऱ्यांना बार, वाईनशॉपवाले ५०० आणि १०००ची नोट स्वीकारण्यास नकार देऊ लागले. त्यामुळे मद्यालयातील गर्दी ओसरली आहे. अनेक मद्यालयांचा धंदा पाच ते दहा टक्क्यांवर आला आहे. रोज १०० ते २०० ग्राहक ज्या बार, वाईन शॉपमध्ये येतात, तेथे आता दहा ते पंधराच ग्राहक येत असल्यामुळे अनेक मद्यालयाच्या संचालकांची नशा उतरली आहे. त्यामुळे हादरलेल्या मद्यालय संचालकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन शक्कल लढवल्या आहेत.



आॅर्केस्ट्रात उधळा पाचशे, हजार !
काहीजण आपल्या नियमित ग्राहकांना मेसेज पाठवित आहेत. बिलाची चिंता करू नका, मद्याचा आस्वाद घ्यायला या. डेबीट कार्ड, क्रेडिट कार्डद्वारे तुम्ही बिल देऊ शकता. दोन्ही कार्ड नसेल तर बिल ‘उधार’ ठेवले जाईल, अशीही ‘उदार’ भूमिका मेसेजमधून काहींनी स्पष्ट केली आहे. मद्यपींचे बिल ५००, १०००ची नोट स्वीकारून चुकता करण्यास नकार देणाऱ्या एका आॅर्केस्ट्रा बारच्या संचालकाने विशिष्ट मद्यपींना आॅर्केस्ट्रात बसून ५००, १०००ची नोट उधळण्याची मुभा दिल्याची सूत्रांची माहिती आहे.
बहुतांश बार मालकांनी मद्यासोबत चखना, गाजर, काकडी, चटणी आणि बॉयल पिनट तसेच थोडासा चिवडा मोफत देणेही सुरू केल्याची माहिती आहे. सीताबर्डीत एका बारमालकाने रोख बिल देणाऱ्या ग्राहकाला काऊंटरवर ‘लव्ह पेग’ (स्मॉल पेग) मोफत देणे सुरू केले आहे. अनेक वाईन शॉपवाल्यांनी चिवडा, शेव पॅकेट मोफत देणे सुरू केले आहे. मद्यालयातील वर्दळ वाढविण्यासाठी सुरू झालेल्या या योजनांची मद्यपींमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.

Web Title: Money Zodiac of Money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.