सुमेध वाघमारे नागपूर : शासकीय वैद्यकीयमहाविद्यालयामधील (जीएमसी) २०१९ एमबीबीएस बॅचच्या विद्यार्थ्यांचा दीक्षांत सोहळा सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडला. कठोर परिश्रम आणि समर्पण भावनेतून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. उत्साह आणि अपेक्षांचे क्षण असलेल्या या जीएमसीमधील पहिल्याच सोहळ्याने सर्वांचे लक्ष वेधले.
प्रमुख पाहुणे म्हणून जी.एच. रायसोनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, जीएमसीचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, उपअधिष्ठाता डॉ. देवेंद्र माहोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे व डॉ. समीर गोलावार उपस्थित होते. या दीक्षांत सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी वैद्यकीय व्यवसायातील नैतिकता आणि मूल्यांचे पालन करण्याची शपथ घेतली. त्यांना पदवी प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. रिना वाघ व डॉ. रिना कळसी यांच्या नेतृत्वात २०२२ च्या बॅचच्या एमबीबीएस विद्यार्थ्यांनी केले. आभार डॉ. माहोरे यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येत पालक उपस्थित होते. आपल्या मुलांच्या या यशाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
जिथे सर्वाधिक गरज आहे तेथून रुग्णसेवेची सुरुवात करा-डॉ. गजभियेअधिष्ठाता डॉ. राज गजभिये म्हणाले, ग्रामीण भागात आरोग्य सुविधांची उपलब्धता शहरांच्या तुलनेत खूपच कमी असते. त्यामुळे, आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग अशा ठिकाणी केल्यास, खऱ्या अर्थाने गरजवंत लोकांची सेवा घडेल. तिथे सोयीसुविधांचा अभाव असू शकतो, आव्हाने अधिक असू शकतात; पण त्यातून मिळणारे समाधान निश्चितच खूप मोठे आणि अनमोल असेल. ग्रामीण भागात अनेक गंभीर आजारांवर वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात येते. अशा परिस्थितीत, जर आपण स्वत:हून पुढे येऊन त्यांना मदत केली, तर त्यांच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल घडवू शकतो. त्यांचे आशीर्वाद आणि त्यांच्या चेहऱ्यावरील कृतज्ञता हे आपल्या कामाचे सर्वांत मोठे पारितोषिक असेल.
एआयचा वापर करताना मानवी मूल्यांना प्राधान्य द्या -डॉ. देशपांडेकुलगुरू डॉ. देशपांडे म्हणाले, आज कृत्रिम बुद्धिमत्ता जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. ह्यएआयह्णमध्ये प्रचंड क्षमता आहे, पण ते मानवी भावना, सहानुभूती आणि नैतिक मूल्यांची जागा घेऊ शकत नाही. एआयचा निर्णय घेताना आणि कृती करताना मानवी स्पर्श आणि विचार महत्त्वाचे असतात. विशेषत: आरोग्य सेवेसारख्या संवेदनशील क्षेत्रांमध्ये ह्यएआयह्णचा वापर करताना मानवी मूल्यांना सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करताना माणसांमधील मानवता, नैतिकता आणि सामाजिक बांधीलकी विसरता कामा नये, असे आवाहनही त्यांनी केले.