‘क्षण एक पुरे...’ भावपूर्ण नाट्यप्रयोग
By Admin | Updated: October 10, 2014 00:59 IST2014-10-10T00:59:29+5:302014-10-10T00:59:29+5:30
प्रतिभावंत नाट्यलेखिकांना प्रोत्साहित करणाऱ्या पद्मगंधा प्रतिष्ठानच्यावतीने लेखिका नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला आजपासून प्रारंभ करण्यात आला. हा महोत्सव ११ आॅक्टोबरपर्यंत

‘क्षण एक पुरे...’ भावपूर्ण नाट्यप्रयोग
पद्मगंधा प्रतिष्ठान : लेखिका नाट्य महोत्सवाचा प्रारंभ
नागपूर : प्रतिभावंत नाट्यलेखिकांना प्रोत्साहित करणाऱ्या पद्मगंधा प्रतिष्ठानच्यावतीने लेखिका नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला आजपासून प्रारंभ करण्यात आला. हा महोत्सव ११ आॅक्टोबरपर्यंत सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर येथे सुरू आहे. यंदा या नाट्यमहोत्सवाचे १६ वे वर्ष होते.
महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी मदन गडकरी, संस्थेच्या अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक शुभांगीताई भडभडे, नाट्य विभाग प्रमुख प्रतिभा कुळकर्णी, माला केकतपुरे प्रामुख्याने उपस्थित होत्या. सुप्रसिद्ध साहित्यिक सुधा डोंगरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या महोत्सवातील प्रारंभीचे नाटक ‘क्षण एक पुरे...’ आज सादर करण्यात आले. मानवी जीवनातील निरामय, सुखी व आनंदी जीवनानुभूतीसाठी अकृत्रिम व निरागस प्रेमभावना अनिवार्य असते. किंबहुना अशा हळुवार प्रेमाशिवाय आयुष्य म्हणजे वैराण वाळवंटच. या प्रेमाचे स्वरूप व्यक्तीसापेक्ष बदलत असले तरी त्याची अनिवारता, उत्कटता व समरसता मात्र सारखीच असते. ‘क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव पडो मररणांचा’ याच विषयाचे भावपूर्ण सादरीकरण करणारा हा प्रयोग होता. प्रतिभावंत लेखिका माणिक वड्याळकर लिखित व रोशन नंदवंशी दिग्दर्शित या दोन अंकी नाटकाने अखेरपर्यंत रसिकांना खिळवून ठेवले. एका मध्यमवर्गीय कुटुंबाभोवती गुंफलेले हे कथानक होते.
अंथरुणाला खिळलेले वयोवृद्ध भाऊ, घरातील कर्तव्यदक्ष विधवा सून सुलभा, तिची लहान मुलगी मीनी व मोठ्या भावाच्या दुर्दैवी मृत्युनंतर कुटुंबाची जबाबदारी पेलणारा तरुण नाना, या नानाशी लग्न करू इच्छिणारी मात्र या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या नाकारणारी त्याची प्रेयसी तृप्ती. अखेर आईच्या मृत्यूनंतर खऱ्या प्रेमाची किंमत कळलेली तृप्ती आणि तिला प्रेमाचे जाणवलेले महत्त्व नाटकातून अधोरेखित करण्यात आले. यात श्याम आस्करकर, महेश गोडबोले, सीमा गोडबोले, विजय अंधारे, समृद्धी पुंजे, आकाश दुधनकर, नेहा अहेर यांनी भूमिका केल्या. नेपथ्य संजय काशीकर, अमोल निंबर्ते, संगीत अनिल इंदाणे, प्रकाश मिथून मित्रा, रंगभूषा आसावरी रामेकर, निर्मिती राजू बावनकर व सुनील आडगावकर, सहनिर्मिती रवींद्र फडणवीस यांची होती. (प्रतिनिधी)