कुख्यात संतोष आंबेकर गँगवर मकोका

By Admin | Updated: January 28, 2016 03:01 IST2016-01-28T03:01:26+5:302016-01-28T03:01:26+5:30

कुख्यात गँगस्टर संतोष आंबेकर टोळीविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगार नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई केली.

Mokoka on the infamous Santosh Ambekar gang | कुख्यात संतोष आंबेकर गँगवर मकोका

कुख्यात संतोष आंबेकर गँगवर मकोका

सोनेगाव प्रकरणात कारवाई : गुन्हेगार हादरले
नागपूर : कुख्यात गँगस्टर संतोष आंबेकर टोळीविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगार नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई केली. पोलिसांनी सोनेगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जमीन बळकावण्याप्रकरणात आंबेकरसह ११ गुन्हेगारांविरुद्ध कारवाई केली आहे. यात युवराज माथनकर, सचिन अडुलकर, विजय बोरकर, लोकेश कुलटकर, गौतम भटकर, संजय फातोडे, आकाश बोरकर, विनोद मसराम, प्रकाश मानकर आणि शक्ती मनपिया याचा समावेश आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. गुन्हे शाखेचे डीसीपी रंजन शर्मा आणि झोन एकचे डीसीपी शैलेश बलकवडे यांनी यासंबंधी माहिती दिली.
उद्योजक स्वप्नील बडवई यांचे मनीषनगरातील सहकार धाम येथे घर आहे. आरोपींनी ३० ते ४० साथीदारांच्या मदतीने १८ जानेवारी रोजी दुपारी त्यांच्या घरावर बळजबरीने कब्जा केला. घरात तोडफोड करून बडवई यांना जीवे मारण्याची धमकी दिली. आंबेकर गँगची शहरात दहशत असल्याने सुरुवातीला बडवई तक्रार दाखल करण्यास घाबरत होते. पोलिसांनी सुद्धा तक्रारीला फारसे गांभीर्याने घेतले नाही. २४ जानेवारी रोजी सोनेगाव पोलिसांनी दंगा भडकविण्याचा गुन्हा दाखल केला. आंबेकर या गँगचा प्रमुख आहे. त्याच्या इशाऱ्यावरूनच युवराज आणि इतर आरोपींनी बडवईच्या घराची तोडफोड करून कब्जा केला होता. यामुळेच मकोकाची कारवाई करण्यात आली असल्याचे रंजन शर्मा यांनी सांगितले. शर्मा यांनी सांगितले की, या प्रकरणात ३० ते ४० जण सहभागी होते.

दबदबा बनविण्याची तयारी
नागपूर : इतर लोकांच्या भूमिकेचाही तपास लावला जात आहे. सध्या युवराज माथनकर, सचिन अडुलकर, विजय बोरकर, आणि लोकेश कुलटकर याला अटक करून दोन दिवसाच्या कोठडीत घेण्यात आले आहे. संतोष आंबेकरसह सात जणांचा शोध सुरू आहे.
सूत्रानुसार काही दिवसांपासून आंबेकर गँग खूप सक्रिय झाली आहे. युवराज व इतर साथीदारांच्या मदतीने नागपुरात दबदबा बनविण्याची तयारी सुरू होती. आपली दहशत पसरवण्यासाठी काही दिवसांपूर्वी आंबेकर गँगने संपूर्ण शहरात होर्डिंग लावले होते. मीडियाने या होर्डिंगची दखल घेताच पोलिसांचेही धाबे दणाणले होते. मुख्यमंत्र्यांनी ‘होर्डिंग वॉर’ला अतिशय गांभीर्याने घेतले होते. २६ जानेवारी रोजी आंबेकरने काही युवकांच्या टोळीसह शहरात रॅली काढली होती. पोलिसांची परवानगी न घेताच काढण्यात आलेली ही रॅली दिवसभर शहरात फिरत होती. सोनेगाव ठाण्यात साथीदारांच्या मदतीने दंगा भडकवण्याचा गुन्हा दाखल होऊनसुद्धा आंबेकरवर त्याचा काहीही परिणाम झाला नसल्याचे दिसून येताच पोलिसही सक्रिय झाले. पोलिसांनी आंबेकर व त्याच्या साथीदाराविरुद्ध सदर पोलीस ठाण्यात परवानगी न घेता रॅली काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर तातडीने मकोकाची कारवाई करण्यात आली.
संतोष आंबेकर, युवराज माथनकर, संजय फातोडे, गौतम भटकरने अंबाझरी पोलीस ठाण्यात एका अनिवासी भारतीय महिलेच्या बंगल्यावरही कब्जा केला होता. तत्कालीन सहपोलीस आयुक्त संजय सक्सेना यांच्या हस्तक्षेपानंतर अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या घटनेनंतर आंबेकर गँग खूप सांभाळून काम करीत होती.(प्रतिनिधी)

आता ‘शूट आऊट’ची दहशत
काही दिवसांपूर्वी अंबाझरी येथील शूट आऊट प्रकरणात सुटलेल्या टोळीने आठवडाभरापासून शहरात दहशत पसरवली आहे. ही टोळी नुकतीच तुरुंगातून बाहेर आली आहे. या टोळीला सोडवून आणण्यास आंबेकरची मुख्य भूमिका राहिली आहे. ही टोळी झोन १ व झोन ३ च्या पोलीस ठाणे हद्दीत दहशत पसरवीत आहे. ही टोळी पाच-सहा ठिकाणांवर कब्जा करण्याच्या प्रयत्नात आहे. गांधीबाग येथील एका व्यावसायिक इमारतीवर कब्जा करण्याचा प्रयत्नसुद्धा या टोळीने केला होता. शूट आऊटमध्ये निर्दोष सुटल्यानंतर ही टोळी फॉर्मात आहे. त्यामुळे शूट आऊटची पुनरावृत्ती कधीही होऊ शकते.
लोकमतने केला होता खुलासा
लोकमतने महिनाभरापूर्वीच मनीषनगर परिसरात गुन्हेगार एकत्रित आल्याचा खुलासा केला होता. पोलिसांच्या ताज्या कारवाईने याला दुजोरा मिळाला. सूत्रानुसार मकोकाच्या कारवाईची माहिती होताच आंबेकर आणि त्याचे साथीदार फरार झाले आहेत.

Web Title: Mokoka on the infamous Santosh Ambekar gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.