कुख्यात भुल्लर टोळीतील तिघांविरुद्ध मकोका
By Admin | Updated: January 29, 2016 05:29 IST2016-01-29T05:29:05+5:302016-01-29T05:29:05+5:30
व्यावसायिकांचे अपहरण करून त्यांच्याकडून खंडणी वसूल करणाऱ्या कुख्यात भुल्लर टोळीच्या म्होरक्यासह तिघांवर

कुख्यात भुल्लर टोळीतील तिघांविरुद्ध मकोका
नागपूर : व्यावसायिकांचे अपहरण करून त्यांच्याकडून खंडणी वसूल करणाऱ्या कुख्यात भुल्लर टोळीच्या म्होरक्यासह तिघांवर पोलिसांनी मकोका लावला आहे. पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी पत्रकारांना गुरुवारी दुपारी ही माहिती दिली. टोळीप्रमुख हरविंदरसिंग ऊर्फ गोल्डी कुलवंतसिंग भुल्लर (वय २९), त्याचा भाऊ हरजिंदरसिंग ऊर्फ पिंटू (वय २४) आणि जुजारसिंग कश्मीरसिंग ढिल्लो (वय २४, तिघेही रा. पाटणकर चौकाजवळ, जरीपटका) अशी या गुंडांची नावे आहेत.
महिनाभरापूर्वीच कारागृहातून बाहेर आलेल्या कुख्यात भुल्लर टोळीने शहरातील व्यावसायिकांचे अपहरण करून त्यांच्याकडून खंडणी वसुलीचा सपाटा लावला. राजकिरण ऊर्फ छोटू केवलराम हरियानी (वय ३७) याला आरोपी गोल्डी आणि जुजारसिंग यांनी १३ ते २२ जानेवारीदरम्यान मंगळवारी बाजार मैदान येथे बोलवले. हातातील चांदीचे बे्रसलेट दाखवून यासारखे सोन्याचे ब्रेसलेट पाहिजे, असे म्हणून ठार मारण्याची धमकी देऊन पाच लाखांची खंडणी मागितली. आरोपींच्या दहशतीमुळे हरियानीने त्यांना ८० हजार रुपये दिले. तर, याच गोल्डी भुल्लर आणि त्याचा भाऊ पिंटू भुल्लरने ५ ते १३ जानेवारीदरम्यान महेश ऊर्फ जितेंद्र टोपनदास लालवाणी (वय ३५, रा. हेमू कलानी चौक) या व्यापाऱ्याचे दीड लाखाच्या खंडणीसाठी अपहरण केले. त्याला घरामागच्या मैदानात नेऊन बेदम मारहाण केली.
खंडणी न दिल्यास ठार मारू, मुलाचे शाळेतून अपहरण करू, अशीही धमकी दिल्यामुळे लालवाणीने भीतीपोटी ५० हजार रुपये देऊन त्यावेळी स्वत:ची सुटका करून घेतली. दरम्यान, खंडणीचा त्रास असह्य झाल्यामुळे या दोघांनीही पोलिसांकडे तक्रार केली. विशेष म्हणजे, मार्च २०१५ मध्ये हे गुंड प्रतिस्पर्धी टोळीवर फायरिंग करून कारागृहात पोहोचले होते. जामिनावर परत येताच त्यांनी पुन्हा भाईगिरी सुरू केल्यामुळे पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनी त्याची गंभीर दखल घेतली. (प्रतिनिधी)
शनिवारी नेणार कोर्टात
४हे तिघे शनिवारपर्यंत जरीपटका पोलिसांच्या कस्टडीत आहेत. शनिवारी त्यांना विशेष न्यायालयात हजर करून मकोकाची पुढील कारवाई करण्यात येईल. या प्रकरणाचा तपास एसीपी ढोले यांच्याकडे आहे. भुल्लर टोळीच्या आणखी काही गुंडांची चौकशी सुरू असून, त्यांच्यावरही पोलीस कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. संबंधितांची कसून चौकशी सुरू असल्याचेही लाटकर यांनी सांगितले. या टोळीचा खरा सूत्रधार ‘कलेर’ याच्याही मुसक्या आवळण्याची पोलिसांनी तयारी चालवली असून, एका प्रकरणात त्याचा जामीन रद्द करण्यासाठी आज पोलिसांनी धावपळ केली.
रवी कारवाला पसार
या प्रकरणाशी संबंधित गहाण ठेवलेली ‘ती’ कार कुणाची त्याची माहिती फिर्यादीकडून मिळालेली नाही. चेसीस आणि इंजिन नंबरच्या आधारे कारमालकाचा शोध घेतला जात आहे. दुसरे म्हणजे, या कारबाबत इत्थंभूत माहिती रवी नामक तरुणाला आहे. परंतु, तो गुन्हा दाखल झाल्यापासून पसार झाल्याचे उपायुक्त लाटकर यांनी सांगितले. रवी हाती लागल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे होऊ शकतात, असेही लाटकर यांनी सांगितले. दरम्यान, १० दिवसांपूर्वीच ठाणेदार म्हणून जरीपटक्यात रुजू झालेल्या अशोक बागुल यांची बदली करण्यात आली. ते रुजू होताच भुल्लर प्रकरण समोर आले आणि त्यांची लगेच बदली झाल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. प्रत्येक जण या बदलीच्या अनुषंगाने वेगवेगळे तर्क लावत आहेत. नेमके कोणते कारण आहे, त्याबाबत बोलण्याचे बहुतांश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टाळले.