कुख्यात वसिम चिऱ्या टोळीविरुद्ध मोक्का
By Admin | Updated: November 13, 2015 02:38 IST2015-11-13T02:38:03+5:302015-11-13T02:38:03+5:30
लकडगंजमधील कुख्यात गुंड शेख मुदस्सीर शेख निसार ऊर्फ वसिम चिऱ्या आणि त्याच्या सहा साथीदारांविरुद्ध पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली.

कुख्यात वसिम चिऱ्या टोळीविरुद्ध मोक्का
चिऱ्या फरारच : लकडगंज पोलिसांची कारवाई
नागपूर : लकडगंजमधील कुख्यात गुंड शेख मुदस्सीर शेख निसार ऊर्फ वसिम चिऱ्या आणि त्याच्या सहा साथीदारांविरुद्ध पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली. विशेष म्हणजे, वसिम चिऱ्या आणि त्याचा साथीदार शेख निसार शेख हफिज हे गेल्या दोन महिन्यांपासून फरार आहेत.
गेल्या दहा वर्षांपासून वसिम चिऱ्या गुन्हेगारीत सक्रिय आहे. खून, खुनाचे प्रयत्न, लुटमार, खंडणी वसुली, जमीन बळकावणे, गुन्हेगारांच्या बैठका घेऊन त्यांच्यातील वाद संपुष्टात आणण्यासाठी मांडवली करणे, असे गंभीर गुन्हे वसिम चिऱ्या आणि त्याच्या टोळीतील सदस्यांवर दाखल आहेत. त्याने पूर्वी त्याच्याच टोळीत असलेल्या नबाब अनवर मोहम्मद हबीबउर रहमान याची हत्या केली. कारण अनवरने गेल्या काही दिवसांपासून वसिमचा प्रतिस्पर्धी कुख्यात तिरुपती भोगे याच्याशी हातमिळवणी केली होती. अनवर स्वत:ची टोळी निर्माण करण्याच्या प्रयत्नात असल्याचे लक्षात आल्यानेच वसिम चिऱ्या आणि त्याच्या टोळीतील अब्दुल बासीद ऊर्फ पटेल अब्दुल नवाब, सैयद शोहराब ऊर्फ भय्या सैयद अहफाज, शेख वसीम उर्फ छोटा वसीम शेख हबीब, सैयद अय्याज अली फय्याज अली, शेख मुदस्सीर ऊर्फ गोलू शेख गुलाम आणि एक अल्पवयीन आरोपी यांनी अनवरची हत्या केल्याचे उघड झाल्यामुळे पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव, सहआयुक्त राजवर्धन सिन्हा आणि अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली लकडगंज पोलिसांनी वसिम चिऱ्या आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई केली. एसीपी डॉ. एन.एम. पांडे हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.(प्रतिनिधी)
फरारीतही गुन्हेगारी
वसिम चिऱ्या आणि त्याच्या सात साथीदारांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यातील सहा जणांना लकडगंज पोलिसांनी अनवरच्या हत्येच्या आरोपात अटक केली. मात्र टोळीचा प्रमुख वसीम चिऱ्या तसेच शेख निसार हे दोघे फरार आहेत. फरारीत राहूनही वसिम चिऱ्याने दोन गंभीर गुन्हे केलेले आहेत. अनवरचा गेम केल्यानंतर फरार असूनही चिऱ्या स्वत:च्या टोळीची दहशत वाढविण्याचे प्रयत्न करीत आहेत.