चेनस्नॅचर्सच्या टोळीविरुद्ध मोक्का
By Admin | Updated: May 4, 2016 03:38 IST2016-05-04T03:38:09+5:302016-05-04T03:38:09+5:30
उपराजधानीत सोनसाखळी चोरीचे एका पाठोपाठ तब्बल १६ गुन्हे करणाऱ्या कुख्यात चेनस्नॅचर्स टोळीविरुद्ध सीताबर्डी

चेनस्नॅचर्सच्या टोळीविरुद्ध मोक्का
नागपूर : उपराजधानीत सोनसाखळी चोरीचे एका पाठोपाठ तब्बल १६ गुन्हे करणाऱ्या कुख्यात चेनस्नॅचर्स टोळीविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी मोक्का लावला आहे. तीन जणांच्या या टोळीत एका सराफा व्यापाऱ्याचाही सहभाग आहे. सहायक पोलीस आयुक्त एन.डी. इंगोले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत ही माहिती दिली.
मोहम्मद साजीद ऊर्फ बाबा फैज मोहम्मद सिद्दीकी (वय ३२, रा. मोठा ताजबाग), अप्पू ऊर्फ शफीक रफीक खान (रा. बहादुरा, नंदनवन) आणि या दोघांकडून चोरीचे सोने विकत घेणारा सराफा व्यावसायिक राकेश शरदचंद्र निनावे (वय २७, रा. भोतमांगे लेआऊट, बहादुरा नंदनवन) अशी या टोळीतील सदस्यांची नावे आहेत.
३१ जानेवारीला एका ज्येष्ठ नागरिक महिलेची सोनसाखळी साजीद आणि अप्पूने हिसकावून नेली होती. ही तक्रार मिळाल्यानंतर सीताबर्डी पोलिसांनी प्रारंभी साजीदला अटक केली; नंतर त्याच्याकडून चोरीचे सोने विकत घेऊन त्याची विल्हेवाट लावणारा सराफा राकेश निनावे याच्या मुसक्या बांधल्या. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे उपायुक्त शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार बंडीवार यांनी पोलीस उपनिरीक्षक एस.डब्ल्यू. मत्ते, आर.के. मुंढे, महिला उपनिरीक्षक एम.एच. वाघाडे, हवालदार अजय काळे, नारायण किराड, नायक प्रशांत निनावे, कमलेश गणेर, अतुल चाटे, प्रेम पाटील यांचे पथक छत्तीसगडमधील नक्षलप्रभावित कांकेर जिल्ह्यात पाठविले. तेथून पोलिसांनी कुख्यात अप्पूला पकडून नागपुरात आणले. चौकशीत या तिघांनी सीताबर्डीत तीन, कळमन्यात दोन, हुडकेश्वर पाच, प्रतापनगर दोन आणि धंतोलीत दोन तसेच अन्य दोन अशा चेनस्रॅचिंगच्या एकूण १६ गुन्ह्यांची कबुली दिली. त्यातील १० गुन्ह्यातील सोने पोलिसांनी आरोपींकडून जप्त केले होते. साजीद आणि अप्पू एक वर्षापासून गुन्हे करीत होता, असेही तपासात स्पष्ट झाले होते. या तिघांचे गुन्हेगारी कृत्य संघटित गुन्हेगारीचे असल्याने अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे यांनी त्यांच्यावर मोक्का लावण्याचे आदेश दिले. त्यानुसार, ही कारवाई करण्यात आल्याचे ठाणेदार बंडीवार यांनी पत्रकारांना सांगितले. (प्रतिनिधी)
लोकमतने दिले होते वृत्त
‘लोकमत’ने २० फेब्रुवारीच्या अंकात सीताबर्डीत पकडण्यात आलेल्या चेनस्नॅचर्सच्या नाकात मोक्काची वेसण टाकण्यात येणार असल्याचे वृत्त ठळकपणे प्रकाशित केले होते. पत्रकार परिषदेतही त्याचा उल्लेख झाला, हे विशेष.