नागपूरशी नाळ जुळलेली मोहिनी ‘नासा’तील ऐतिहासिक क्षणांची साक्षीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 11:17 AM2021-03-04T11:17:54+5:302021-03-04T11:18:18+5:30

Nagpur News मंगळावर ‘नासा’चे ‘पर्सिव्हरेन्स रोव्हर’ उतरले आणि एक इतिहास घडताना जगाने पाहिला. नागपूरशी नाळ जुळलेली २३ वर्षीय मोहिनी जोधपूरकर हिला प्रत्यक्ष ‘नासा’त राहून या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली.

Mohini, which is connected to Nagpur, witnessed the historic moments in NASA | नागपूरशी नाळ जुळलेली मोहिनी ‘नासा’तील ऐतिहासिक क्षणांची साक्षीदार

नागपूरशी नाळ जुळलेली मोहिनी ‘नासा’तील ऐतिहासिक क्षणांची साक्षीदार

googlenewsNext
ठळक मुद्देमंगळावर उतरलेल्या ‘पर्सिव्हरेन्स रोव्हर’च्या चमूची सदस्य

मेहा शर्मा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मंगळावर ‘नासा’चे ‘पर्सिव्हरेन्स रोव्हर’ उतरले आणि एक इतिहास घडताना जगाने पाहिला. नागपूरशी नाळ जुळलेली २३ वर्षीय मोहिनी जोधपूरकर हिला प्रत्यक्ष ‘नासा’त राहून या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली. आपल्या आयुष्यातील ही एक मोठी संधी असल्याची भावना तिने व्यक्त केली.

अमेरिकेतील अ‍ॅरिझोना विद्यापीठातील पदवीधर असलेली मोहिनी ही ‘नासा’च्या ‘पर्सिव्हरेन्स रोव्हर’ प्रकल्पाच्या चमूची सदस्य असून, ‘कोलॅबरेटर’ म्हणून ती सहयोग देत आहे. मोहिनीचे सल्लागार डॉ. जिम बेल हे ‘रोव्हर’चे डोळे बनलेले दोन कॅमेरे असलेल्या ‘मास्टकॅम-झेड’ या उपकरणाचे प्रमुख अन्वेषक आहेत. त्यांची विद्यार्थिनी असल्यामुळे तिला या ‘रोव्हर’ प्रकल्पात सहभागी होण्याची संधी मिळाली. ‘रोव्हर’च्या ‘लँडिंग’संदर्भात झालेल्या बैठकीचादेखील तिला भाग होता आले. ‘लँडिंग’च्या जागेच्या ‘मॅपिंग’वर काम करण्यासोबतच ती ‘रोव्हर’ने पुढे नेमके काय करावे, यासाठी काम करणाऱ्या चमूसोबतदेखील कार्यरत आहे. सोबतच दिवसाच्या एकूणच कामाचे ‘डॉक्युमेन्टिंग’ करण्याचीदेखील तिच्यावर जबाबदारी आहे.

ज्यावेळी ‘रोव्हर’ मंगळाच्या पृष्ठभागावर उतरले तेव्हा तो खरोखरच उत्कंठावर्धक क्षण होता. महामारीच्या काळातदेखील ही मोहीम यशस्वी ठरणे हा मोठा सकारात्मक संदेश होता, अशी भावना मोहिनीने व्यक्त केली.

अशी जुळली ‘नासा’शी

‘इंटर्नशीप’दरम्यान ‘नासा’द्वारे अनुदानित संशोधन प्रकल्पासमवेत मोहिनी जुळली होती. तो प्रकल्प मंगळाशी संबंधित होता. पुढील उन्हाळ्यात वॉशिंग्टनमधून तिने शुक्रावर आधारित पदवी पातळीवरील शोधप्रबंध सादर केला. त्यानंतर अमेरिकेच्या ‘जिऑलॉजिकल सर्व्हे’त चंद्र व मंगळाशी संबंधित अभ्यासप्रकल्पात ती विद्यार्थी ‘कॉन्ट्रॅक्टर’ झाली. तिने शुक्र व चंद्रावर संशोधन केले. आता ती थेट डॉ. जिम बेल यांच्या मार्गदर्शनात काम करीत आहे. ‘रोव्हर’वरील कॅमेरे तयार करण्यापासून त्याचे व्यवस्थापन व नियंत्रण याचे काम ही चमू पाहते. मंगळावर भविष्यात ‘मॅन्ड मिशन’दरम्यान कुठे ‘लँडिंग’ करता येईल, यासंदर्भात मोहिनी संशोधन करीत आहे.

लहानपणापासूनच सौरमालेचे आकर्षण

 

वयाच्या दुसऱ्या वर्षीपासूनच मोहिनीला सौरमालेचे व अंतराळाचे आकर्षण होते. लहानपणीच तिला सौरमालेतील सर्व ग्रहांची त्यांच्या स्थानानुसार नावे पाठ होती. ‘स्टार ट्रेक’ या चित्रपटातून मला मोठी प्रेरणा मिळाली, असे तिने सांगितले.

भारतीय महिलेकडेच नेतृत्व

भारतीय मूळ असलेल्या संशोधक स्वाती मोहन या प्रकल्पाच्या प्रमुख आहेत. त्यांना काम करताना पाहणे हे प्रेरणादायी व उत्साह वाढविणारे असते. त्यादेखील भारतातून आल्या असून, ‘स्टार ट्रेक’मध्ये होत्या. एकाच चमूत वेगवेगळ्या देशातील लोक एकत्रितपणे काम करीत असल्याने नवीन दृष्टिकोन मिळत आहे, असे मोहिनीने सांगितले.

असे आहे ‘नागपूर कनेक्शन’

मोहिनीचे आजोबा व पालक दोघेही नागपूरचे असून, ती दरवर्षी शहराला भेट देते. वॉशिंग्टन डी.सी.मधील सल्लागार संस्थेत कार्यरत असणाऱ्या जितेंद्र जोधपूरकर यांची ती मुलगी आहे. तर आई माधवी या ‘पॅसिफिक आर्किटेक्ट्स अ‍ॅन्ड इंजिनिअर्स’मध्ये वरिष्ठ ‘रिक्रूटर’ आहेत. स्व. मुकुंद लोखंडे व वृंदा लोखंडे तसेच विलास व भावना जोधपूरकर यांची ती नात आहे.

Web Title: Mohini, which is connected to Nagpur, witnessed the historic moments in NASA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :NASAनासा