मोरेश्वर मानापुरे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०० कोटींच्या गुंतवणुकीतून नागपुरात भंडारा रोडवर 'पल्सेस प्रोटीन पार्क' उभे राहणार आहे. पार्ककरिता राज्य सरकार जागा उपलब्ध करून देणार आहे. हे महाराष्ट्रातील पहिलेच पार्क राहील.
'पल्सेस प्रोटीन पार्क' म्हणजे डाळींपासून बनवलेल्या प्रथिने उत्पादनांसाठी एक विशेष क्षेत्र किंवा केंद्र. अशा क्षेत्रात डाळींमधून प्रथिने काढली जातील, प्रक्रिया केली जाईल आणि विविध उत्पादनांमध्ये वापरण्यासाठी तयार केली जातील. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची मोहीम 'पल्सेस प्रोटीन पार्क'ची उभारणी नागपुरात महालगाव कापसी येथे चार एकरांत नागपूर दाल मिल क्लस्टर उभारणाऱ्या समूहातर्फे करण्यात येणार आहे. हे क्लस्टर मनोहर भोजवानी यांनी भंडारा मार्गावर उभारले असून, जवळपास १२ वर्षांपासून यशस्वीरीत्या कार्यरत आहे. 'पार्क' मध्ये शेतकऱ्यांसाठी अद्ययावत सुविधा केंद्र राहील.
यामध्ये ५ ते १० हजारांपर्यंत शेतकऱ्यांना सामावून घेतले जाईल. त्यांनी उत्पादन घेतलेल्या तूर, चना, मूग, उडीद, मसूर, वाटाणा आदी डाळींना चांगला दर मिळेल, शिवाय डाळींवर प्रक्रियाही करण्याची विशेष व्यवस्था राहील. यामुळे शेतकऱ्यांना मूल्यवर्धित सेवा उपलब्ध होईल. हे पार्क म्हणजे शेतकऱ्यांना डाळींसंदर्भात आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि आत्मनिर्भर करण्याचा राज्य सरकारचा प्रमुख भाग आहे.
अशी आहे 'पल्सेस प्रोटीन पार्क'ची संकल्पना :
- माती ते बियांच्या विकासापर्यंत विविध प्रक्रिया.
- शेतकऱ्यांसाठी सामायिक सुविधा केंद्र.
- डाळींतून प्रथिने काढण्यासाठी आधुनिक मशीनची उभारणी.
- पाळीव प्राणी आणि माशांसाठी उच्च प्रथिनेयुक्त उत्पादनांची निर्मिती.
- डाळींची लागवड आणि उच्च प्रथिने निर्मितीसाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण.
प्रधान कृषी सचिवांची दाल मिल क्लस्टरला भेट
राज्य सरकारच्या कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी अलीकडेच नागपूर दाल मिल क्लस्टरला भेट दिली. त्यावेळी रस्तोगी यांच्यासोबत समूहाने 'पल्सेस प्रोटीन पार्क' संदर्भात विस्तृत चर्चा केली. यासंदर्भातील प्रकल्प अहवाल आधीच तयार असल्याचे त्यांना सांगितले. पार्क उभारणीसाठी त्यांनी होकार दिला असून, प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यास सांगितले. समूहाने पार्ककरिता जागेची पाहणी सुरू केली आहे.
"डाळींमध्ये नैसर्गिकरीत्या १४ ते ३९ टक्के प्रथिने असतात. त्याचे मूल्यवर्धन होण्यासाठी 'पल्सेस प्रोटीन पार्क' उभारण्यात येणार आहे. ५ ते १० हजार शेतकरी पार्कसोबत जुळतील आणि डाळींपासून मूल्यवर्धित प्रथिनांची निर्मिती करतील. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होईल. पार्कमध्ये शेतकऱ्यांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध राहील. पार्क लवकर उभारणीसाठी प्रयत्न सुरू आहेत."- मनोहर भोजवानी, अध्यक्ष, नागपूर दाल मिल क्लस्टर