मोक्षधाम रेल्वे ओव्हरब्रीजची स्लॅब कोसळली
By Admin | Updated: October 24, 2016 02:46 IST2016-10-24T02:46:47+5:302016-10-24T02:46:47+5:30
मागील अनेक वर्षांपासून मोक्षधाम येथील रेल्वे ओव्हरब्रीजला अवकळा प्राप्त झाली आहे.

मोक्षधाम रेल्वे ओव्हरब्रीजची स्लॅब कोसळली
धोक्याची घंटा : पूर्ण पूल कोसळल्यावर प्रशासनाला जाग येणार काय?
नागपूर : मागील अनेक वर्षांपासून मोक्षधाम येथील रेल्वे ओव्हरब्रीजला अवकळा प्राप्त झाली आहे. रविवारी तर या पुलाचा काही भाग कोसळून खाली पडला. परंतु या गंभीर बाबीकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे हा पूल कोसळून जीवितहानी झाल्यावरच रेल्वे प्रशासनाला जाग येणार काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या पुलाच्या स्थितीबाबत ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला आहे.
मोक्षधाम घाटाजवळ रेल्वेचा ओव्हरब्रीज आहे. या ओव्हरब्रीजला अवकळा प्राप्त झाली आहे. या पुलाखालून दिवसाकाठी हजारो नागरिक, बसगाड्या, दुचाकीस्वार, पादचारी ये-जा करतात. हा पूल कोसळल्यास जीवितहानी होण्याची मोठी शक्यता आहे. या पुलावरून जाणाऱ्या रेल्वेगाड्यातील शौचालयाचे पाणी वाहनचालकांच्या अंगावर टपकते.
रेल्वे प्रशासनाने आतापर्यंत अनेकदा या पुलाची डागडुजी केली. परंतु त्यावर कायमचा तोडगा काढण्यात रेल्वे प्रशासनाला अपयश आले. या पुलावरून दिवसाकाठी १०० ते १२५ रेल्वेगाड्या ये-जा करतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास कोणत्याही क्षणी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. हावडा-मुंबई मार्गावर असलेला हा पूल कोसळल्यास रेल्वे वाहतूक विस्कळीत होऊन त्याचा मोठा परिणाम रेल्वे प्रवाशांवर होणार आहे.
त्यामुळे कोसळत चाललेल्या या पुलाची त्वरित डागडुजी करून रेल्वे प्रशासनाने नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)